नाशिकमध्ये भीषण अपघातात 6 ठार, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत
उमेश परिक, टीव्ही 9 मराठी, नाशिक : येवला-मनमाड रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. येवला-मनमाड रोडवरील अंकाई बारी येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. सकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला, तर सहा जणांचा जागीच मृत्यू […]
उमेश परिक, टीव्ही 9 मराठी, नाशिक : येवला-मनमाड रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. येवला-मनमाड रोडवरील अंकाई बारी येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. सकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला, तर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असून ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रहिवासी होते. तर आयशर गाडीचा चालक हा अपघातात बचावला असून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघातातील आयशर गाडी हरियाणा येथील आहे.
आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास येवला-मनमाड रोडवर अंकाई बारी येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. त्यावेळी दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या गाड्यांची वेग जास्त असल्याने त्या एकमेकांना अशा पद्धतीने धडकल्या की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जेसीबीच्या मदतीने पोलिसांनी ह्या मृतदेहांना बाहेर काढलं.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने नगर परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर आयशर गाडीच्या फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.