सोलापुरात पोलिसाला चोरी करताना रंगेहाथ अटक
चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले आपण पहिले असेल आणि ऐकलंही असेल. मात्र सोलापुरात चक्क पोलिसालाच चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
सोलापूर : चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले आपण पहिले असेल आणि ऐकलंही असेल. मात्र सोलापुरात चक्क पोलिसालाच चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये हा अजब प्रकार घडला. अक्कलकोट पोलिसांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याला जप्त वाहनाचे टायर चोरी करताना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी पोलीस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीप्रकरणी वाहन क्रमांक एमएच 12 येयु 7637 ट्रक जप्त केला. जप्त केलेला ट्रक पोलिसांनी अक्कलकोटच्या जुन्या पोलीस वसाहतीसमोर उभा केला. मात्र, मंगळवारी (7 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास पोलीस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे आणि त्याच्या इतर तीन साथीदार हे जप्त केलेल्या ट्रकचे टायर ट्यूब आणि डिस्क चोरताना आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी पोलीस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे आणि त्यांच्या तीन साथी दारांना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांच्यावर अक्कलकोट पोलीस ठाण्यात कलम 379 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एका पोलिसाला अशा प्रकारे चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेसोबतच इतर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
Police Officer arrested red handed