सोलापूरच्या वाळलेल्या भाकरीची चव आता सातासमुद्रापार
सोलापूर : महिलांनी मनात आणलं तर त्या काय करू शकतात याच उत्कृष्ट उदाहरण सोलापुरात पाहायला मिळालं. सोलापुरातील लक्ष्मी नावाच्या महिलेने भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. लक्ष्मी यांचा सोलापुरात वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय आहे. बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी हा व्यवसाय करतात. लक्ष्मी यांनी दोन महिलांच्या साहाय्याने संतोषी माता महिला गृहउद्योग या नावाने हा व्यावसाय सुरु […]
सोलापूर : महिलांनी मनात आणलं तर त्या काय करू शकतात याच उत्कृष्ट उदाहरण सोलापुरात पाहायला मिळालं. सोलापुरातील लक्ष्मी नावाच्या महिलेने भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. लक्ष्मी यांचा सोलापुरात वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय आहे. बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी हा व्यवसाय करतात.
लक्ष्मी यांनी दोन महिलांच्या साहाय्याने संतोषी माता महिला गृहउद्योग या नावाने हा व्यावसाय सुरु केला. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राची आणि आत्मा या शासकीय संस्थांची त्यांना आर्थिक मदत मिळाली. लक्ष्मी यांची ही वाळलेली भाकरी सोलापुरातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध झाली आहे.
आजतागायत आपल्याकडील शेतकरी केवळ माल उत्पादित करत आला आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र त्याने अवगत केले नसल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत आला आहे. मात्र लक्ष्मी यांच्या भाकरी व्यवसायाने हा समज खोटा ठरवला आहे. एक किलो ज्वारी विकल्यास साधारणपणे 16 ते 18 रुपये मिळतात. जर त्याच एक किलो ज्वारीवर प्रक्रिया केली, तर त्यातून प्रक्रिया खर्च वगळता किमान दीडशे रुपये प्रतिकिलो नफा मिळू शकतो.
ज्वारी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र अलीकडच्या काळात ज्वारीबद्दल अनेक नकारात्मक गोष्टींची अफवा उठवली गेली. ती खोडून काढण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे. ज्वारीपासून अनेक पदार्थ बनवता येणे शक्य आहे. लक्ष्मी यांनी ज्वारीपासून भाकरीच नाही तर केक, बिस्किट, रवा अशा गोष्टी बनविल्या असून त्याला बाजारातही चांगली मागणी आहे.
लक्ष्मी यांच्या हा संतोषी माता गृहउद्योग आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. मोठमोठ्या हॉटेलसह सर्वसामान्य खवय्येदेखील लक्ष्मी यांच्याकडूनच भाकरी घेऊन जातात. लक्ष्मी यांच्या या उद्यमशीलतेमुळे त्यांच्यासोबतच आसपासच्या 10-20 महिलांनाही रोजगार मिळाला आहे. एरवी गप्पा मारत बसणाऱ्या महिलांच्या हाताला आता काम मिळाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीदेखील होते आहे.
ज्वारी ही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील काही काळात त्याची जागा ऊसाने घेतल्याने ज्वारी मागे पडत आहे. परंतु लक्ष्मी बिराजदार यांच्यासह अनेक महिलांनी त्याला नवी ओळख आणि वलय निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.