सोलापूरचे धडाकेबाज पालकमंत्री, थेट कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस, स्वत: स्वच्छतागृहांची पाहणी
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील (Datta Bharne visits corona ward) कोरोना वॉर्डाची पाहणी केली.
सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील (Datta Bharne visits corona ward) कोरोना वॉर्डाची पाहणी केली. स्वत: पीपीई किट घालून दत्ता भरणे हे कोरोना वॉर्डात गेले. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी वॉर्डातील रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या, शिवाय कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सची प्रशंसा करुन त्यांचं मनोबलही वाढवलं. महत्वाचं म्हणजे रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर हे आतापर्यंत चेंबरमध्ये बसूनच कोरोना रुग्णांची माहिती घेत होते. मात्र स्वत: पालकमंत्री कोरोना वॉर्डमध्ये गेल्याने, त्यांनाही रुग्णालयात जावं लागलं. (Datta Bharne visits corona ward)
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व बैठका आणि आढावा घेतला. त्यानंतर संध्याकाळी दत्ता भरणे यांनी थेट चक्क सिव्हिल हॉस्पिटल गाठले. पीपीई किट आणि मास्क घालून कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना संशयित रुग्णांच्या वॉर्डात नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डमध्ये घेऊन चला, मला तिथे रुग्णांशी संवाद साधायचा आहे, असे डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर ते थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी संशयित रुग्ण, सारीचे रुग्ण, आयसीयू आणि बाधित स्त्री पुरुष यांच्यासह डॉक्टर आणि नर्सेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. शिवाय वॉर्डातील स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. इतकंच नाही तर ते स्वत: स्वच्छता गृहाजवळ जाऊन, तिथल्या परिस्थितीची पाहणी केली.
माझा सख्खा भाऊ असला तरी कारवाई करा
दरम्यान, सोलापुरात अनेक खासगी रुग्णालये बंद आहेत. मात्र दत्ता भरणे यांनी आक्रमक पवित्रा घेत, जे कोणी डॉक्टर रुग्णालये बंद ठेवतील, त्यांच्यावर कारवाई करा. माझा सख्खा भाऊ, नातेवाईक कोणीही असला तरी मागे-पुढे पाहू नका, थेट कारवाई करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला बजावले.
आयुक्तांची उचलबांगडी
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आयुक्त दीपक तावरे यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर वखार महामंडळचे संचालक पी. शिवशंकर यांची सोलापूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पी. शिवशंकर हे वखार महामंडळाच्या संचालकपदी येण्यापूर्वी त्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.
सोलापुरात कोरोनाचे वाढते रुग्ण
सोलापुरात काल कोरोनाचे 74 रुग्ण वाढले. त्यामध्ये आज आणखी 9 रुग्णांची भर पडली. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 860 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे सोलापुरात कोरोनाचे 78 बळी गेले आहेत.
खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्याची प्रशासनाची केवळ वल्गनाच आहे की काय असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. कारण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नसल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात अडकलेले 10 हजार 800 मजूर 10 रेल्वेगाड्यातून मूळगावी परतले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने प्रशासनाने दिलेली शिथिलता रद्द करण्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तसंच शाळा सुरु करण्याची घाई सरकारने करु नये अशी पालकांची मागणी आहे.