तृप्ती देसाईंना कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या महाराजांची माफी
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना फोनवरुन धमकी देणाऱ्या महाराजांनी (Somnath Maharaj Apologies) आता त्यांची जाहीर माफी मागितली आहे.
शिर्डी : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना फोनवरुन धमकी देणाऱ्या महाराजांनी (Somnath Maharaj Apologies) आता त्यांची जाहीर माफी मागितली आहे. “माझ्या फोनवरील वक्तव्याशी इंदोरीकर महाराजांचा संबंध नाही. माझा राग अनावर झाल्याने मी बोललो. माझ्या संभाषणाने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो” (Somnath Maharaj Apologies), असं तृप्ती देसाई यांना धमकी देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी म्हटलं.
फोनवरुन तृप्ती देसाईंना धमकी
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी फोनवरुन धमकी दिली होती (Trupti Desai Threaten call) आहे. “जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही, तर तुला कापूनच टाकतो,” अशी धमकी सोमनाथ महाराज भोर यांनी दिली होती.
“किर्तनातून महिलांचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत आहे. पण 21 फेब्रुवारीला मी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला.
त्यावर समोरुन “मी सोमनाथ महाराज भोर, अकोले तालुक्यातून बोलत आहे, असे सांगण्यात आले. तुम्ही तृप्ती देसाई बोलताय का असा प्रश्न विचारल्यानंतर मी हो म्हणून उत्तर दिले. त्यानंतर समोरुन अश्लील शिवीगाळ सुरू केला. शिवीगाळ सुरू केल्यामुळे मी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले.
त्यात तू जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्याशिवाय, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केला,” असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता.
मला कापून टाकण्याची भाषा हे महाराज करीत आहे. त्यामुळे माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला पुन्हा एकदा इंदोरीकर समर्थकांकडून धोका निर्माण झाला आहे, असेही तृप्ती देसाईंना म्हटले होते. याबाबत त्यांनी पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे तक्रार दाखल केली. मात्र, आता त्याच सोमनाथ भोर महाराजांनी तृप्ती देसाई यांची जाहीर माफी (Somnath Maharaj Apologies) मागितली आहे.