नवी दिल्ली : रमजान महिना लक्षात घेता लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ऐवजी पहाटे 5 पासून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत आवश्यक आदेश जारी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस दीपक गुप्ता आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत एका याचिकेवर सुनावणी झाली, ज्यात ही मागणी करण्यात आली होती.
मोहम्मद निजामुद्दीन पाशा आणि असद हयात यांच्याकडून याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे अजून तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे दोन ते अडीच तास अगोदरच मतदान सुरु करावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
रमजान महिना 6 मेपासून सुरु होण्याची शक्यता आहे, याच दिवशी पाचव्या टप्प्याचं मतदान आहे. रमजानमध्ये मुस्लीम रोजा ठेवतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. याबाबत आयोगाला सोमवारी एक मागणीही केली होती, पण त्याचं उत्तर मिळालं नाही, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.
निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यात तापमान वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीमुळे मुस्लिमांचं घराबाहेर निघणं कठीण होईल आणि मतदानासाठी रांगेत उभं रहावं लागेल. सोबतच सकाळी नमाज आणि सहरी केल्यानंतर रोजा ठेवणारे जास्तीत जास्त लोक आराम करणं पसंत करतात, असंही याचिकेत म्हटलंय.