फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावजेवण, सोलापुरात ‘लालूशेठ’चा वाढदिवस दिमाखात साजरा
बार्शीतल्या शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली.
सोलापूर : बार्शीतल्या शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली (Stray Dog Birthday Celebration). फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावकऱ्यांसाठी गाव जेवणाची सोय या भटक्या कुत्र्याचा वाढदिवशी करण्यात आली. या कुत्र्याच्या वाढदिवसाची चर्चा सोलापूरसह पंचक्रोशीत सुरु आहे. सर्वांचे वाढदिवस होतात, मग त्याचा का नाही (Stray Dog Birthday Celebration). म्हणून त्याच्या वाढदिवसाला अख्ख गावं झटलं आणि मोठ्या धूमधडाक्यात त्याचा वाढदिवस साजरा झाला.
सोलापुरातील बार्शीतल्या शेंद्री गावातील फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावकऱ्यांसाठी गाव जेवणाची लगबग, उत्साहात वावरणारी गावातील लहान मंडळी पाहता एखादा विवाह सोहळाच सुरु आहे की काय असा भास होतो. मात्र, ही सर्व तयारी गावातील एका भटक्या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी करण्यात आली होती. लालूशेठ असं त्या ‘बर्थ-डे डॉग’चं नाव. लालूशेठ हा कुणाच्या घरचा पाळीव कुत्रा नाही, तर गावात भटकणारा कुत्रा आहे. लालूशेठ हे लोकांनी त्याला दिलेलं नाव. याच लालूशेठचा वाढदिवस गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावात अनेक लहान-मोठ्यांचे वाढदिवस साजरा केले जातात, मग आपल्या लालूने काय बिघडवल? म्हणून त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. लोकवर्गणी गोळा करण्यात आली. सगळ्यांनी आपापल्या परीने हातभार लावत लालूशेठचा वाढदिवस साजरा केला.
लालूशेठला शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी डिजीटल फ्लेक्सही लावला. त्यावर “आज लालूशेठचा 16 वा वाढदिवस” असं लिहिलं होतं.
गावात अनेक भटके कुत्रे आहेत. मात्र, त्यापैकी लालूशेठ जरा हटकेच. तो कधी कुणाला चावला नाही, विनाकारण अंगावर गेला नाही. इतकंच काय तर लहान मुले त्याच्यावर बसल्यावर लालूशेठने कधीच त्यांना इजा पोहोचवली नाही. म्हणून लालूशेठचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या या कार्यक्रमात कसलीच कसर सोडली नाही. केकपासून गावजेवणापर्यंत सगळी व्यवस्था करुन वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
एकीकडे सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी काही जण मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळतात. सोशल मीडियावर कुत्र्यांना उंच इमारतीवरुन खाली फेकल्याचा, तलावात टाकल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. तर दुसरीकडे, शेंद्री गावात भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शेंद्री ग्रामस्थांचा हा उपक्रम इतराांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.