मोठी बातमी: ऊसतोड मजुरांचा संप स्थगित; सुरेश धस यांची घोषणा
ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसन होऊ नये म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. | Suresh Dhas
पुणे: ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांना वाढीव मजुरी मिळावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. ऊसतोड आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या सुरेश धस यांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसन होऊ नये म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अधिवेशनात राज्य सरकारने यासाठी कायदा मंजूर करावा. ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या मजुरीत 85 टक्के वाढ झाली पाहिजे. अन्यथा दोन महिन्यांनी पुन्हा संप करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला. ( Suresh Dhas called of strike of sugercane cutters)
तत्पूर्वी आज पुण्यात संपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठक पार पडली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी राज्यातील ऊस तोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी धस यांनी शरद पवार यांच्याकडे ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या मजुरीत 85 टक्के वाढ व्हावी, अशी मागणी केली. याबाबत अधिवेशनात निर्णय होईपर्यंत थांबण्याची तयारी सुरेश धस यांनी दर्शविली.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटनेसह ऊसतोड मजुरांच्या जवळपास 11 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आता सुरेश धस यांनी संप स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अन्य संघटना काय निर्णय घेतात, हे पाहायला लागेल. ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ करण्यात यावी, मुकादमांचं कमिशन साडे 18 टक्क्कांवरुन 37 टक्के करण्यात यावं तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ 50 टक्के करण्यात यावी, अशी मागणी सुरेश धस यांच्या संघटनेकडून करण्यात आली होती.
तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांनी अधिक न ताणता 21 रुपयांची दरवाढ मिळाली तर ऊसतोडणीसाठी निघावे, अशी भूमिका घेतली होती. यामुळे ऊसतोड आंदोलनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमनेसामने आले होते. काही संघटनांच्या हट्टामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. अन्यथा हा प्रश्न दोन महिन्यांपूर्वीच निकाली निघाला असता, असा टोला पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना लगावला होता.
संबंधित बातम्या:
पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर
सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा
पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमनेसामने
( Suresh Dhas called of strike of sugercane cutters)