नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, – सुप्रिया सुळेंचा सणसणीत टोला
माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का ? संसदेत मी जाणार की माझा नवरा ? नवऱ्याला संसदेत (येणं) अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला हाणला.
पुणे | 26 फेब्रुवारी 2024 : माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का ? संसदेत मी जाणार की माझा नवरा ? नवऱ्याला संसदेत (येणं) अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला हाणला. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार ( अजित पवार यांची पत्नी) असा सामना रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरले आहेत. ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुप्रिया सुळे यांना पराभत करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन ते करत आहेत. याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. पुण्यातील वडगाव येथील सभेत बोलताना, त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही पण त्यांच्या टीकेचा रोख सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी शरद पवारांचा हात सोडला आणि भाजपची साथ दिली तेव्हापासून दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर टीका करतात, टोलेबाजी करत असतात. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामान रंगण्याची चिन्हं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. खुद्द अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत. त्यादरम्यान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य करत टीका केली होती. त्याच मुद्यावरून प्रत्युत्तर देताना बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली.
पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी ?
तुम्हाला कसा खासदार पाहिजे ? सदानंद सुळे चालतील का ? (मी) सदानंद सुळे यांना पाठवते, ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का ? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे ? नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. पर्स सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
मी मेरिटवर लढते, सदानंद सुळेंना मतं मागायला पाठवत नाही
एवढंच नव्हे तर सुनेत्रा पवारांसाठी मतदारसंघाच फिरणाऱ्या अजित पवारांवर त्यांनी आणखीही टीकास्त्र सोडले. ‘ मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मै सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी ’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावलं. बारामतीमध्ये एकंदरच नणंद वि. भावजय हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे.