…मग पुरुषांना म्हसोबाचा माळ लावणार का? ‘ गंगा भागीरथी’ म्हणण्यावरून सुषमा अंधारे यांचा सवाल
विधवा महिलांना अशा प्रकारे विशेषण लावल्यानंतर त्यांची ओळख जाहीर केली जाईल, असा आक्षेप राज्यातील महिला संघटनांनी घेतलाय.
मुंबई : राज्यातील महिला सक्षम आहेत.लोढांनी उगाच लोड घेऊ नये. महिला सक्षमीकरणासाठी आपली बुद्धी खर्ची घालावी, अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून द्यावा, यासाठी इथून पुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी (गं.भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव नुकताच तयार करण्यात आलाय. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य शासनाच्या सचिवांना हा प्रस्ताव दिला आहे. अनेक महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या प्रस्तावावरून आक्रमक टीका सुरु केली आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणण्यावरून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, राज्यात ज्या खात्याला महिला मंत्री नाहीत, तिथं असं असंवेदनशील विधान येणारच.. गंगा भगीरथी महिलांना तर पुरुषांना म्हसोबाचा माळ लावणार का? असा फाजीलपणा लोढा यांनी करु नये… माझं तर म्हणणं आहे लोढा यांनी जास्त लोढ घेऊ नये.. याऐवजी महिलांबद्दल प्रचंड असंवेदनशीलतेने विधानं येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून येत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गंभीर का नाहीत? त्यांच्याही घरात महिला आहेत. मग शिरसाट, कंबोज, लोढांनी केलेलं वक्तव्य ते गांभीर्याने का घेत नाहीत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
तर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनीही यावरून जोरदार टीका केली आहे. अशा महिलांना गंगा भागीरथीच का म्हणायचं… सरस्वती, दुर्गा का नाही म्हणायचं? महिलांना संकुचित करण्याच काम यानिमित्ताने सुरु आहे. महिला ही सक्षम आहे. वेगवेगळ्या रुपानं तिच्याकडे पाहिलं जातं. असे काही मुद्दे उपस्थित करून मुळ मुद्द्याला बगल दिली जातेय, असा आरोप सचिन अहिर यांनी केलाय.
पंकजा मुंडेंचाही सवाल
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील गंगा भगीरथी या शब्दावरून आक्षेप घेतला आहे. आपल्या संस्कृतीत कुणीही थेट विधवा म्हणतच नाहीत. गंगा भगीरथीच म्हणतात. पण शासनाचा नियम आला असेल तर मग पत्नी वारलेल्या पुरुषांना काय म्हणायचं.. असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलाय.
महिला संघटना आक्रमक
विधवा महिलांना अशा प्रकारे विशेषण लावल्यानंतर त्यांची ओळख जाहीर केली जाईल, असा आक्षेप राज्यातील महिला संघटनांनी घेतलाय. विविध ठिकाणच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केलाय.
मंगल प्रभात लोढांचं स्पष्टीकरण काय?
गंगा भागीरथी असं संबोधण्यासंबंधीचा एक प्रस्ताव आला होता. तो मी राज्याच्या सचिवांना पुढे पाठवला आहे. मात्र त्याबाबत पूर्ण निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय.