रायगडमध्ये पुलाच्या खांबावर संशयास्पद मजकूर, हाफिज सईदचा उल्लेख
उरण तालुक्यातील खोपटा येथे एका पुलाच्या खांबावर संशयास्पद मजकूर आणि नकाशाप्रमाणे काही आकृत्या आढळल्याचे समोर आले आहे.
रायगड : उरण तालुक्यातील खोपटा येथे एका पुलाच्या खांबावर संशयास्पद मजकूर आणि नकाशाप्रमाणे काही आकृत्या आढळल्याचे समोर आले आहे. हा मजकूर दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उरण पोलिसांनी या मजकुराचा आणि आकृत्यांचा तपास सुरु केला आहे. उरण तालुक्यात ओएनजीसी (ONGC), नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी (JNPT), विद्युत केंद्र असे प्रमुख आणि संवेदनशील प्रकल्प आहेत. त्यामुळे खोपटा येथील पुलाच्या भिंतीवर लिहिलेल्या दहशतवादाशी संबंधित मजकुराने पोलिसांच्या चिंतेत वाढ केली आहे.
खोपटा येथील पुलाच्या भिंतीवर काळ्या रंगाच्या मार्करने 3 भागात हा संदेश लिहिलेला आहे. यामध्ये “धोनी जन्नत मे आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल” या नावांचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे “दहशतवादी हाफिज सईद, रहिम कटोरी, राम कटोरी” यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजीमध्ये काही सांकेतिक आकडे देखील लिहिले आहेत.
पुलावरील या संदेशाच्या बाजूला एक आकृती काढलेली आहे. त्यामध्ये इंम्पोर्ट, एक्सपोर्ट जहाज पोर्ट (जेएनपीटी), एअरपोर्ट, गॅस पेट्रोल दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेत तपासाची सुत्रे हलवली आहे.