Tanay Manjrekar | पुण्याचा तनय मांजरेकर ‘हायपरलूप’मध्ये बसणारा पहिला भारतीय
अमेरिकेतील लास वेगासमध्ये व्हर्जिन 'हायपरलूप'च्या मानवी चाचणीत तनय मांजरेकर सहभागी झाला होता
मुंबई : मूळ पुणेकर असलेला तनय मांजरेकर (Tanay Manjrekar) हा ‘हायपरलूप’च्या चाचणी पॉडने (Hyperloop test pod) प्रवास करणारा पहिला भारतीय ठरला आहे. ‘हायपरलूप’ हे भविष्यात हायस्पीड प्रवासाची क्रांती घडवणारे तंत्रज्ञान आहे. अमेरिकेतील लास वेगासमध्ये व्हर्जिनच्या ‘हायपरलूप’ पॉडमध्ये चाचणी करत तनयने इतिहास घडवला. (Tanay Manjrekar becomes the first Indian to ride a HyperLoop test pod)
हायपरलूप पॉडने चाचणीदरम्यान 15 सेकंदात ताशी 170 किलोमीटरचा वेग पकडला. एका क्षणात (परिमाण – jiffy) पॉडने 400 मीटर अंतर कापले. “हायपरलूप पॉडने प्रवासाचा अनुभव अत्यंत स्मूथ होता. ही माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय 15 सेकंद होती” अशा भावना तनयने चाचणीनंतर व्यक्त केल्या. वेस्ट वर्जिनियामध्ये सहा मैल अंतराचा हायपरलूप मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव व्हर्जिन हायपरलूपने दिला आहे.
“प्रचंड मेहनत आणि टीमवर्कमुळे हे शक्य झाले. मी राईड घेण्यास खूप उत्सुक होतो” असंही तनय म्हणाला. हायपरलूप सुरक्षित आणि स्थिर राहील, याच्या सर्टिफिकेशन प्रक्रियेचा भाग म्हणून ही मानवी चाचणी घेण्यात आली. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विशेषज्ञ तनय मांजरेकर आणि व्हर्जिनच्या आयटी विभागातील व्यवस्थापक अँनी ह्युन यांनी टेस्ट पॉडने प्रवास केला. “प्रवासासाठी तुम्ही अंतराळवीरांसारखे कपडे घालायची गरज नाही, आम्ही नेहमीचे कपडे घातले, फक्त सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे” असेही तनयने सांगितले.
“हायपरलूप पॉडमध्ये प्रवाशांना अॅक्सलरेशन जाणवू नये, असा प्रयत्न असेल. चाचणी पॉड दोन सीटर होता, परंतु अखेरीस व्यावसायिक पॉडमध्ये 28 प्रवाशांची आसनक्षमता असेल” असं तनयने स्पष्ट केलं.
“मुंबई-पुण्यात हायपरलूप व्हावे”
कमर्शियल हायपरलूप कुठे असेल आणि कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला दशकभराचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. “ते भारतात कुठेही तयार होऊ शकते. मी मुंबईला येऊन पुण्याला हायपरलूप घेऊन जाऊ शकतो. हे खरोखर भारतात असावे अशी माझी इच्छा आहे” असंही तनय म्हणाला.
महाराष्ट्रात मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूपचा प्रस्ताव आहे, मात्र त्याचा अंतिम निर्णय अद्याप अस्पष्टच आहे. गहुंजे-ओझर्डे या मार्गावर हायपरलूप प्रकल्पासाठी चाचपणी झाली होती. (Tanay Manjrekar becomes the first Indian to ride a HyperLoop test pod)
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात गहुंजे आणि ओझर्डे ही दोन गावं आहेत. दोन गावांमध्ये जवळपास 105 किलोमीटर अंतर आहे. रस्ते मार्गाने हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानामुळे बाराशे किलोमीटर प्रतितास वेगाने अंतर गाठता येऊ शकतं. या हिशोबाने गहुंजे ते ओझर्डे अंतर केवळ पाच ते दहा मिनिटांत कापता येऊ शकतं.
हायपरलूप म्हणजे नेमकं काय?
‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.
हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंद गतीने सुरु आहे.
संबंधित बातम्या :
अजित पवारांनी बासनात गुंडाळलेल्या ‘हायपरलूप’साठी एकनाथ शिंदे आग्रही
मुंबई-पुणे गुंडाळल्यानंतर मुंबई-दिल्ली हायपरलूपसाठी प्रस्ताव, विमानापेक्षा जलद प्रवास
(Tanay Manjrekar becomes the first Indian to ride a HyperLoop test pod)