मुंबई : मुंबईतील लोकल आणि बस वाहतूक तूर्तास सुरुच राहणार आहे. मात्र मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर चार शहरातील अत्यावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं आणि कार्यालयं बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. (Thackeray Government War against Virus)
कोरोनाला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप कठोर निर्णय घेण्यात आलेले नाहीत. मुंबई MMRDA भाग, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, किराणा, औषधं, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सर्व कार्यालये बंद राहतील, ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 50 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर आणणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकल-बेस्ट सुरु
रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस वापरत आहोत, ती कारणं बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
?Important updates from CM Uddhav Balasaheb Thackeray’s announcements today:
From this Midnight, all workplaces will remain closed till 31st March 2020. This is applicable in Mumbai, MMR Region, Pune, Pimpri Chinchwad and Nagpur. #WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2020
पहिली ते आठवीचे विद्यार्थी पास
महाराष्ट्रातील पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. तर नववी आणि अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहे. दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. कालच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 29 मार्चला होणारी सीईटीची परीक्षा 30 एप्रिलला पुढे ढकलली.
आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ?
आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. 234 बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे.
अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले
दुसरीकडे, सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी परतले आहेत. फिलिपीन्समध्ये शिकणारे हे विद्यार्थी भारतात येण्यासाठी निघाले असताना त्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर सर्व 50 विद्यार्थी भारतात परतले आहेत.
दरम्यान, आज 3 नवे रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांची संख्या 52 वर गेली असली तरी महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा आशेचा किरण दिसलेला आहे. राज्यातील 5 कोरोना रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर पुढील 14 दिवस देखरेख ठेवली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
दोन दिवस वाट पाहणार, दोन दिवस जर मुंबईकराना बंद पाळता आला नाही तर 100 टक्के बंद म्हणजे रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला. (Thackeray Government War against Virus)