भारतीय कुस्तीचा जगात ठसा उमटवणारा ‘द ग्रेट गामा’, आयुष्याच्या अखेरीला पदकेही विकावी लागली

5 हजार मुकाबले लढले एकही मुकाबला हरले नाही. वर्ल्ड चॅम्पियान झाले. 1200 किलोचा दगड उचलला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसूम शरीफ यांचे ते आजोबा. पण. त्यांच्या आयुष्याची अखेर अशी झाली की...

भारतीय कुस्तीचा जगात ठसा उमटवणारा 'द ग्रेट गामा', आयुष्याच्या अखेरीला पदकेही विकावी लागली
The Great GamaImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 3:03 PM

1902 सालची गोष्ट. गुजरातच्या वडोदरा येथे कुस्ती स्पर्धा सुरू होती. अनेक कुस्तीपटू आपल्या शक्तीची चुणूक दाखवित होते. पण, आयोजकांनी या स्पर्धेदरम्यान मैदानात एक भला मोठा दगड ठेवला होता. त्या दगडाचे वजन होते तब्बल 1200 किलो. स्पर्धा झाल्यानंतर हा दगड कोण उचलणार याची त्या भल्या मोठ्या मैदानात जमलेल्या प्रेक्षकांना उत्सुकता होती. आलेल्या सर्व पेहलवान प्रयत्न करून थकले. मात्र, कुणालाही तो दगड उचलता आला नाही. प्रत्येकजण इतरांपेक्षा शक्तिशाली होता. पण, तो दगड हलविण्यात कुणालाही यश आले नाही. आयोजक चिंतेत पडले होते. त्याचवेळी एक व्यक्ती पुढे सरसावला. इतर पेहलवान यांच्यापेक्षा उंची जेमतेमच… म्हणजे 5 फुट 7 इंच… त्याला पाहून सगळ्यांन प्रश्न पडला की जिथे भले भले पेहलवान हरले तिथे हा काय करणार?

अचानक मैदानात आलेल्या त्या पहेलवानाने त्या दगडाकडे पाहिले. त्याला हात लावला. मग काही वेळातच तो जमिनीवरचा दगड अवघ्या काही क्षणात त्याच्या हा हात होता. त्याच्या दोन हातांच्या बोटांची मजबूत पकड दगडाभोवती आवळली गेली होती. त्या पेहलावान यासारखा पराक्रम अजूनही कुणी करू शकला नाही. त्याच्या त्या अतुलनीय कामगिरीची ओळख पुसली जाऊ नये यासाठी तो दगड आजही आपणास वडोदरा येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आला आहे. त्या व्यक्तीची ओळख या दगडावर देण्यात आली आहे. “हा दगड गुलाम मोहम्मद यांनी 23 डिसेंबर 1902 रोजी उचलला होता.”

कोण होते गुलाम मुहम्मद?

गुलाम मोहम्मद बक्श म्हणजेच कुस्तीपटू गामा… पंजाबमधील अमृतसरमधील जब्बोवाल गावात 22 मे 1878 रोजी त्यांचा जन्म काश्मिरी मुस्लिम पंडित कुटुंबात झाला. त्याचे वडील मुहम्मद अझीझ बक्श हे दतियाचे तत्कालीन महाराजा भवानीसिंह यांच्या दरबारात कुस्ती खेळायचे. गामा सहा वर्षांचे असताना वडील मोहम्मद अझीझ बख्श यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आजोबा नून यांनी त्यांचा सांभाळ केला. आजोबा नून आणि मामा इडा हे दोघेही पहलवान होते. त्यांच्या देखरेखीखाली गुलाम याने कुस्तीच्या आखाड्यात उडी मारली त्यावेळी त्याचे वय होते अवघे दहा वर्ष. मामा इडा पहेलवान यांच्याकडून त्यांनी कुस्तीचे शिक्षण सुरू केले. मामाने त्याच्या सरावात अनेक बदल केले. इतर कुस्तीपटूंप्रमाणे गामा याचाही सरावही सामान्य होता. पण, त्याच सामान्यपणातील एक असामान्यता अशी होती की, प्रत्येक सामन्यात तो एकाच वेळी चाळीस 40 पैलवानांसोबत कुस्तीचा सराव करायचा. दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटांत शंभर किलोची हसली घालून 5 हजार स्क्वॅट्स आणि 3 हजार पुशअप्स करत असे. स्वतःचे शरीर तयार करण्यासाठी त्याने दगडाचे डंबेल्स बनविले होते. गामाचा दररोजचा आहारही भयानक होता. दर रोज दीड पौंड बदाम मिश्रण, दहा लिटर दूध, हंगामी फळांचे तीन क्रेट, अर्धा लिटर तूप, दोन किलो देशी मटण, 6 देसी चिकन, सहा पौंड लोणी, फळाचा रस आणि इतर पौष्टिक अन्नपदार्थ या त्यांचा आहार होता.

1888 मध्ये जोधपूरच्या महाराज जसवंत सिंग यांनी जोधपूरला कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटू त्या स्पर्धेत सामील झाले होते. या स्पर्धेत सामील झालेल्या कुस्तीपटूंना सर्वात जास्त बैठक किंवा स्क्वॅट्स सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते. दहा वर्षांचा गामा देखील या स्पर्धेत सामील झाला होता. अतिशय दमछाक करणारी अशी ही स्पर्धा होती. सुमारे 450 कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकेक करून स्पर्धेत या स्पर्धेतून बाहेर पडत होते. शेवटी 15 स्पर्धक उरले तेव्हा महाराजांनी ही स्पर्धा थांबवली. महाराज जसवंत सिंग यांनी गामा याच्या धैर्याची प्रशंसा करून त्याला विजेता म्हणून घोषित केले. या पहिल्या विजयामुळे गुलाम मुहम्मद बक्श यांना जमावाकडून मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या. मात्र, या स्पर्धेत स्नायू दुखावल्यामुळे गामा याला आठवडाभर विश्रांती घ्यावी लागली.

सामना अनिर्णित पण देशात नाव झाले…

गामाच्या कारकिर्दीची खरी सुरुवात 1895 मध्ये झाली. त्यांचा पहिला सामना गुजरानवालाचा प्रसिद्ध कुस्तीपटू रहीम बख्श सुल्तानीवाला यांच्याशी झाला. 7 फूट उंचीचा रहीम बख्श हा कुस्तीपटू देखील मूळचा काश्मीरचा. एकही कुस्ती त्याने हरली नव्हती. अशा रहीम बख्श याच्यासमोर 5 फूट 7 इंचाचा गुलाम मुहम्मद बक्श उभा ठाकला. एकीकडे अत्यंत अनुभवी कुस्तीपटू रहीम आणि दुसरीकडे तरुण, उत्साही पैलवान गामा होता. या कुस्तीची देशात बरीच चर्चा झाली. हे द्वंद्वयुद्ध पाहण्यासाठी देशातील बरेच मोठ मोठे लोक आले होते. कुस्तीला सुरवात झाली. सुरुवातीला गामा पैलवान बचावात्मक लढत होते. मात्र, दुसऱ्या डावात ते आक्रमक झाले. चुरशीच्या या लढतीत गामाच्या नाक, तोंड आणि डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. पण, त्याने हार मानली नाही. अखेर हा सामना अनिर्णित राहिला. या कुस्तीमुळे गामा पहेलवान हे नाव संपूर्ण देशात गाजले. गामाने 1910 पर्यंत रहीम बख्श सुलतानीवाला वगळता भारतातील रीवा, ओरछा, ग्वाल्हेर, भोपाळ, इंदोर, बडोदा आणि अमृतसर या दरबारातील कुस्तीपटूंवर विजय मिळवला होता. तर, अन्य सर्व कुस्तीपटूंचा पराभव केला होता. मात्र, इतके करूनही रुस्तम-ए-हिंद या देशातल्या महत्वाच्या किताबापासून काही हात लांब होता.

जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी दिले आव्हान

लंडन येथे जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुलतानीवाला यांच्याविरोधात गामा यांचा सामना पाहण्यासाठी बंगाली करोडपती आणि कुस्ती शौकीन सरतकुमार मित्रा आले होते. गामा यांचे कुस्ती कौशल्य पाहून त्यांनी लंडनला जाण्यासाठी वित्तपुरवठा केला. गामा जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी एप्रिल 1910 मध्ये लंडनला गेले. मात्र, त्यापूर्वी गामा यांच्यासमोर एक नवा अडथळा निर्माण झाला होता. त्यांची उंची खूपच कमी आहे असे सांगून नकार देण्यात आला होता. त्यावेळी गामा यांनी ‘कोणत्याही वजन गटातील कोणत्याही तीन पैलवानांना पराभूत करू शकतो. अवघ्या अर्ध्या तासात त्यांना आखाड्यातून हाकलून देऊ शकतो,’ असे आव्हान दिले.

गामा याने दिलेले आव्हान ही सुरुवातीला सर्वांना अफवा वाटली. त्यामुळे कुणी पुढे आले नाही. त्यामुळे त्यांनी आणखी एक अट घातली ज्यामध्ये फ्रँक गॉच आणि स्टॅनिस्लॉस झेव्हिस्को यांना थेट आव्हान दिले. ‘एक तर या दोघांनी त्यांना द्वंद्वयुद्धात पराभूत करावे. यात स्वतः हरलो तर त्यांना बक्षीसाची रक्कम देऊन घरी परत येईल.’ त्याचे हे आव्हान अमेरिकन कुस्तीपटू बेंजामिन रोलर याने स्वीकारले. गामा याने पहिल्या शिफ्टमध्ये 1 मिनिट 40 सेकंदात रोलर याला जमिनीवर उताणी केले. दुसऱ्या शिफ्टमध्ये 9 मिनिटे 10 सेकंदात त्याने रोलर याला पराभूत केले. दुसऱ्या दिवशीही गामा याने 12 पैलवानांना पराभूत केले आणि त्या स्पर्धेत प्रवेश मिळवला.

बलाढ्य झेविस्को चारी मुंड्या चीतपट

अमेरिकेचा स्टॅनिस्लॉस झेविस्को हा त्या काळातला जगज्जेता कुस्तीपटू होता. तीन वेळा त्याने जागतिक कुस्ती स्पर्धा जिंकली होती. जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गामा याचा सामना झेविस्को याच्याशी 10 सप्टेंबर 1910 रोजी होणार होता. हा दिवस त्या स्पर्धेचा अंतिम दिवस होता. ग्रीक रोमन विश्वविजेता झेविस्को आणि भारताचे अपराजित कुस्तीपटू गामा आमनेसामने आले. कुस्ती सुरु झाली आणि अवघ्या 1 मिनिटात गामा यांनी झेविस्कोला खाली पाडले. 2 तास 35 मिनिटे गामा याने झेविस्कोला जमिनीवर दाबून ठेवले. झेविस्को उठण्यासाठी प्रयत्न जितक्या जोराने करायचा तितक्याच जोराने गामा त्याला जमिनीवर दाबून ठेवायचा. झेविस्को याने बचावात्मक चाल खेळून पाहिली पण ती ही असफल झाली. शेवटी 3 तास चाललेला हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे झेविस्कोच्या चाहत्यांची खूप मोठी निराशा झाली.

झेविस्को आणि गामा यांचा हा सामना अनिर्णीत राहिल्याने आणखी एक सामना जाहीर करण्यात आला. 17 सप्टेंबर 1910 ही सामन्याची तारीख निश्चित करण्यात आली. परंतु, काही कारणास्तव झेविस्को सामन्याला आला नाही. त्यामुळे गामा याला सामन्याचा विजेता घोषित केले गेले. गामा यांना अडीचशे युरो ही बक्षीस रक्कम आणि जॉन बुल बेल्ट सन्मानपूर्वक देण्यात आला. या सन्मानासोबतच रुस्तम-ए-जमाना ही पदवी देखील त्यांना देण्यात आली. पण या मानाचे वैशिष्ट्य म्हणजे सामन्यात न लढताच विजय मिळवला होता.

अखेर… रुस्तम-ए-हिंद किताब मिळालाच

रुस्तम-ए-जमाना ही पदवी आणि जॉन बुल बेल्ट घेऊन गामा भारतात परतले. जागतिक अजिंक्यपद मिळले होते. पण, भारताच्या रुस्तम-ए-हिंद किताबाने गामा यांना हुलकावणी दिली होती. याचे कारण म्हणजे हा किताब रहीम बख्श सुलतानीवाला याच्याकडे होता. जोपर्यंत रहीम बख्श सुलतानीवाला याचा पराभव होत नाही तोपर्यंत गामाला हा किताब मिळणार नव्हता. 1911 मध्ये गामा आणि सुलतानीवाला तिसऱ्यांदा अलाहाबादमध्ये एकमेकांशी भिडले. सुलतानीवाला “दीन दीन इलाही” असा जयघोष करत लाल मातीच्या मैदानात उतरले. वर्षानुवर्षे कुस्ती खेळून तयार झालेले मजबूत हाताचा गामाच्या अंगाला गराडा बसला. पण, काही क्षणातच गामाने पलटी मारली आणि सुलतानीवालाची पाठ जमिनीला टेकली. गामा याने रुस्तम-ए-हिंदचे विजेतेपद पटकावूनच हा सामना संपला. विजयानंतर गामा यांना सर्वात कठीण स्पर्धा कोणासोबत होती असे विचारले असता त्यांनी रहिम बक्श सुलतानीवाला हे नाव सांगितले.

अमेरिकन आणि युरोपियन कुस्तीपटूंविरुद्ध विजयी द्वंद्वयुद्ध

रहिम बक्श सुलतानीवाला यांच्यावर विजय मिळविल्यानंतर 1916 मध्ये गामा यांचा सामना कुस्तीपटू पंडित बिद्दू यांच्याशी झाला. त्यांनाही गामा यांनी पराभूत केले. 1922 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स याने भारताला भेट दिली. या भेटीत प्रिन्सने गामा पहेलवान यांना चांदीची गदा दिली. पुढे 1927 पर्यंत गामाला आव्हान देण्यासाठी एकही कुस्तीगीर देशात शिल्लक नव्हता.

1928 मध्ये पुन्हा एकदा झेविस्को आणि गामा यांच्यात पटियाला येथे लढत झाली. झेविस्को आखाड्यात दाखल झाला. आपले मजबूत शरीर आणि मोठे स्नायू त्यांनी उंचावून दाखवले. त्यावेळी गामा पूर्वीपेक्षा काहीसे बारीक झाले होते. तरीही त्या सामन्यात गामा यांनी झेविस्कोचा अवघ्या 1 मिनिटात पराभव केला. या सामन्यानंतर झेविस्को याने गामा याला वाघ (टायगर) म्हणून संबोधले. पटियालचे महाराज यांनी आनंदित होऊन आपला मोत्याचा हार काढून गामाच्या गळ्यात घातला. त्यानंतर चांदीची गदा हातात धरून महाराजांच्या हत्तीवर गामा स्वार झाला. संपूर्ण शहरातून त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर 1929 मध्ये जेट पीटरसनवर विजय मिळवला. परदेशी कुस्तीपटू यांच्याविरोधातील गामाच्या कारकिर्दीतील हे शेवटचे द्वंद्वयुद्ध होते.

गामा पहेलवानचा मोठा चाहता फायटर ब्रूस ली

हॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता कराटे फायटर ब्रूस ली हा कुस्तीपटू गामा यांचा मोठा चाहता होता. ब्रूस ली याने गामा पहेलवान यांनी आपले सामर्थ्य कसे वाढवले, शरीर कसे बळकट केले. आपली ताकद कशी वाढवली याची सर्व माहिती मिळवली होती. त्या माहितीच्या आधारावर ब्रुस ली याने आपल्या आयुष्यात त्या सर्व गोष्टींचा अवलंब केला. व्यायाम करतानाही ब्रुस ली स्क्वॅट्सही करत असे. ब्रूस ली आणि गामा पहलवान यांची भेट झाली तेव्हा ब्रूस ली याने ‘द कॅट स्ट्रेच’ हा प्रकार शिकून घेतला. गामाचा आहार आणि त्यांचे प्रशिक्षण पाहून ब्रूस ली त्याचा मोठा चाहता बनला. कुस्तीपटू गामा यांनी आपल्या 50 वर्षांच्या जास्त कारकिर्दीत एकही कुस्ती हरले नाहीत. वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप (1910), वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप (1927) या दोन जागतिक स्पर्धा जिंकल्या. तर, 20 व्या शतकाच्या सुरुवातीला कुस्तीपटू गामा रुस्तम-ए-हिंद बनले.

भारताची फाळणी आणि गामा यांचा मृत्यू

1947 मध्ये भारताची फाळणी झाली. गामा पहेलवान अमृतसरहून लाहोरमधील मोहनी रोड येथे स्थायिक झाले होते. त्यावेळी झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यात त्यांनी अनेक हिंदू बांधवांना मुस्लीम जमावापासून वाचवले होते. 1952 च्या दरम्यान त्यांनी कुस्ती सोडली. मात्र, त्याचा प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांना दमा आणि हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. प्रकृती अधिकच बिघडत चालली होती. ते इतक्या आर्थिक संकटात सापडले की शेवटच्या क्षणी त्यांना आपली पदकेही विकावी लागली. 23 मे 1960 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले. त्यांच्या आजारपणाचा सर्व खर्च पाकिस्तान सरकारने उचलला आणि त्यांना काही जमीनही दिली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.