16 वर्षांपासून न जेवणारा सोलापूरचा अवलिया
समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. तो मागील 16 वर्षांपासून अन्नाशिवाय जगतो आहे.
सोलापूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. तो मागील 16 वर्षांपासून अन्नाशिवाय जगतो आहे. दूध आणि दह्यावर तो आपली दैनंदिन भूक भागवतो.
सोलापुरातील नेहरूनगर भागातील 52 वर्षीय राजेंद्र व्हनसुरे व्यवसायाने छायाचित्रकार आहेत. राजेंद्र उत्तम फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेतच, मात्र त्याहून आता चर्चेत आहेत ते त्यांच्या आहाराविषयी. गेल्या 16 वर्षांपासून ते केवळ दूध आणि दह्यावर आहेत. सुरुवातीला दोनवेळा आणि आता चारवेळा दूध हेच त्यांचं अन्न झालं आहे. त्यामुळे गेल्या 16 वर्षांपासून ते जेवण म्हणून ओळख असणाऱ्या पदार्थांना शिवलेही नाहीत.
राजेंद्र यांना 2 मार्च 2003 रोजी केवळ दुधावर राहण्याची कल्पना सुचली. याचं निमित्त महाशिवरात्रीचं होतं. शिवरात्रीच्या दिवशी राजेंद्र यांचा उपवास होता. त्यादिवशी त्यांनी फराळ आणि दूध घेतलं. दुसऱ्या दिवशीही दूध घेऊन बघूया असं वाटलं. त्यानंतर आठवडा, वर्ष करत करत आज 16 वर्षे झाली आहेत. मात्र, या 16 वर्षात राजेंद्र यांना जेवण्याची इच्छा देखील झाली नाही. आपण धार्मिक उपास-तपास यामुळे हे करत नसून शरीर सदृढ राहण्यासाठी हे करत असल्याचं राजेंद्र सांगतात. विशेष म्हणजे या 16 वर्षांच्या काळात एकदाही ते आजारी पडले नाहीत.
मार्च महिन्यात कामानिमित्त बाहेर जात असताना राजेंद्र यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातात राजेंद्र यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, या ऑपरेशनदरम्यान डाव्या पायाचा खुबा मोडला. इतर सर्व हाडे व्यवस्थित असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
राजेंद्र यांच्या या अनोख्या आहारामुळे सुरुवातीच्या काळात कुटुंबीय काळजीत होते. त्यांनी जेवण करावं यासाठी अनेक क्लुप्त्या करण्यात आल्या, मात्र राजेंद्र यांनी आपल्या निश्चयावर ठाम राहणे पसंद केलं. त्यामुळे राजेंद्र यांच्या या अनोख्या पद्धतीची सवय झालीय.
आहारतज्ज्ञ डॉ. ऋषी जोकारे यांनी केवळ दुधावर अशाप्रकारे जीवंत राहणं शक्य असल्याचं सांगितलं. मात्र, केवळ दुधापासून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळत नसल्याचंही अभ्यासकांनी सांगितलं आहे.
जेवण बंद केल्याने राजेंद्र यांना कोणताही त्रास नाही, ना ते 16 वर्षात कधी आजारी पडले. पूर्वी मात्र त्यांना एका वर्षात 10 ते 15 वेळा डॉक्टरांकडे जावे लागत होते. आता मात्र आहारातील या बदलामुळे त्यांचे आजार कमी झाल्याचं राजेंद्र व्हनसुरे यांचं म्हणणं आहे. माणसाचे आहार हे आहारातून होत असतात. त्यामुळे आहार शैलीत अनेक जण सध्या बदल करत आहेत. तसाच काहीसा बदल राजेंद्र यांनी केला आहे.