अतिविशिष्ट व्यक्तींचे निवासस्थान असुरक्षित, अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत, तपासणीत धक्कादायक वास्तव
या तपासणीत राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस या अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती आणि कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाबद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. तरीही प्रशासन तयारीला लागलंय. सुरक्षेच्या दृष्टीनं नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागानं शहरातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी केली. या तपासणीत राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस या अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती आणि कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांचा बळी गेला. त्यानंतर अहमदनगरच्या आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मात्र, सरकारी यंत्रणा अद्यापही याबद्दल गंभीर नसल्याचं दिसून येते.
वीज, पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा
महापालिकेच्या अग्निशमन विभागानं राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास यासह शहरातील २८ सरकारी इमारती आणि विश्रामगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली. कुठेही यंत्रणा नाही, तर कुठे यंत्रणा आहे, तर ती कार्यरत नसल्याचं उघडकीस आलंय. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसलेल्या कार्यालयांना अग्निशमन विभागाच्या अधिनियमातील कलम ६ नुसार नोटीस बजावलीय. नोटीस बजावल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा कार्यरत न केल्यास संबंधित कार्यालयांची वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागानं दिलाय.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्याही निवासस्थानाची यंत्रणा बंद
अग्निशमन यंत्रणा नसल्यानं किंवा बंद असल्यानं आग लागल्याच्या घटना अनेकदा घडतात. मात्र, तरीही अग्निशमन यंत्रणेबाबत सरकारी यंत्रणाच गंभीर नसल्याचं दिसून येतं. त्यात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यासारख्या अतिविशिष्ट व्यक्तींच्या निवासस्थानावरही अग्निशमन यंत्रणा बंद असणे गंभीर आहे.
धोका असलेल्या अतिमहत्त्वाच्या इमारती
राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, सुयोग बिल्डिंग, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे, वनामती (रामदासपेठ) सेमिनरी हिल्स येथील सी.पी.डब्ल्यू. विश्रामगृह, डब्ल्यूसीएल विश्रामगृह, सिव्हिल लाईन डब्ल्यूसीएल विश्रामगृह, कल्पनानगर, रेल्वे क्लब विश्रामगृह, रेल्वे सातपुडा विश्रामगृह, एम.ई.सी.एल. विश्रामगृह, एनपीटीआय विश्रामगृह, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर विश्रामगृह, वन विभाग विश्रामगृह, ऑटोमिक एनर्जी विश्रामगृह या धोका असलेल्या अतिमहत्त्वाच्या इमारती आहेत.
वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना