प. उपनगरवासियांनो त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला ट्रेनने चला, नाशिक आणि डहाणू रेल्वेने जोडण्याची योजना
त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला आता लवकरच बोरीवली वांद्रे येथील रहीवाशांना रेल्वेने जाता येणार आहे. मध्य रेल्वेने नाशिक ते डहाणू ही दोन शहरे जोडण्यासाठी शंभर किमीचा रेल्वे मार्ग टाकण्याची योजना आखली आहे.
त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला ट्रेनने चला, नाशिक आणि डहाणू रेल्वेने जोडण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरवासियांना रेल्वेने त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला जाता येणार आहे. नाशिक -डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमीनीच्या सर्वेक्षणासाठी ( Final Location Survey ) एकूण रु.अडीच कोटी रुपयांच्या खर्चास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू या दोन प्रमुख शहरांना जोडणारा 100 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. हा मार्ग झाल्यानंतर धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी ( ज्या ठिकाणी श्री राम वनवासात राहिले ते ठिकाण ) त्या पवित्र तिर्थस्थळाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे मार्गाने आता दर्शन घेता येणार आहे.धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील ज्यामुळे या प्रदेशातील आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळणार आहे.
कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका
नाशिक -डहाणू नवीन रेल्वे मार्ग आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, कनेक्टीव्हीटी सुधारण्यात आणि महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनासाठी एकूण व्यापारी प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान, बहुप्रतीक्षित कल्याण-बदलापूर सेक्शनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने होत आहे. कल्याण पलिकडील प्रवाशांना या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे कल्याणच्या पलिकडे जाण्यासाठी अधिक ट्रेन चालविणे शक्य होणार आहे. या मार्गिकांवरील नवीन उड्डाण पुलाचे अनावरण गेल्या आठवड्यात पूर्ण झाले. हा रोड ओव्हरब्रिज 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्ण तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत हा कॉरिडॉर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.