पुण्यात बॅटरी चोरांनी ट्रकचालकाला भोसकलं
पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी हत्यांचं सत्र सुरुच आहे. काल बुधवारी तीन गोळीबाराच्या घटनेनंतर, आज गुरुवारी मध्यरात्री ट्रक चालकाची हत्या झाली आहे. बॅटरी चोरांनी छातीत धारदार शस्त्राने भोसकून ट्रक चालकाची हत्या केली. हडपसरला द्राक्ष संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही हत्या झाली. दत्तात्रय भोईटे असं मृत वाहनचालकाचं नाव आहे. भोईटे हे ट्रक पार्क […]
पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी हत्यांचं सत्र सुरुच आहे. काल बुधवारी तीन गोळीबाराच्या घटनेनंतर, आज गुरुवारी मध्यरात्री ट्रक चालकाची हत्या झाली आहे. बॅटरी चोरांनी छातीत धारदार शस्त्राने भोसकून ट्रक चालकाची हत्या केली. हडपसरला द्राक्ष संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही हत्या झाली. दत्तात्रय भोईटे असं मृत वाहनचालकाचं नाव आहे. भोईटे हे ट्रक पार्क करुन झोपले असताना त्यांना कोणीतरी बॅटरी चोरत असल्याचा संशय आला. खाली उतरुन तपासणी करताना बॅटरी चोर आढळून आले. यावेळी वादावादी झाल्यानं बॅटरी चोरट्यांनी धारधार शस्त्राने छातीवर सपासप वार केले. यामुळं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं भोईटे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दत्तात्रय भोईटे हे साताऱ्याचे रहिवासी असून ट्रकचालक होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कोणी केली, हत्येची आणखी काही कारण आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
पुण्यात एका दिवसात तीन गोळीबार
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे ते एकाच दिवसात तीन वेळा समोर आला. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या. विविध ठिकाणी घडलेल्या या तीन घटनांमुळे पुणे हादरलं. धक्कादायक म्हणजे एका पोलीस निरीक्षकावरही गुन्हेगारांनी गोळीबार केला.
पुण्यात सकाळी चंदननगरच्या आनंद पार्क परिसरात इंद्रामनी सोसायटीमध्ये महिलेवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनुजा भाटी यांचा मृत्यू झाला.
दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान कोंढवा परिसरात येवलेवाडीत ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये दोन कामगार जखमी झाले.
पुण्यातील गोळीबाराची तिसरी घटना रेल्वे स्थानकात घडली. सकाळी चंदननगरमध्ये महिलेची गोळीबार करुन हत्या करणाऱ्यांनीच हा गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या हल्लेखोरांकडून पोलीस निरीक्षकावर गोळीबार करण्यात आला.
चंदननगर फायरिंग मधील आरोपी झेलम एक्स्प्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले. पकडण्याचा प्रयत्न करताच एकाने गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या पोटात लागल्या. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातमी