डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोठे होणार? तुकाराम मुंढे यांचा महत्वाचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन सुरू आहे. याच काळात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr.Babasaheb Aambedkar jayanti) आहे.
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन सुरू आहे. याच काळात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr.Babasaheb Aambedkar jayanti) आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी एकत्रित होणारा जनसमुदाय लक्षात घेता ‘कोरोना’चा प्रसार गर्दीतून होऊ नये म्हणून यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समूहाने एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरी करता येणार नाही. कार्यालय आणि इतर ठिकाणीही जयंती कार्यक्रमात पाचपेक्षा अधिक लोकं नको आणि ते ही सामाजिक अंतर राखूनच कार्यक्रम घेण्यात यावा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी (Dr.Babasaheb Aambedkar jayanti) केले आहेत.
सध्या महाराष्ट्रात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असून या कायद्याअंतर्गत दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी हा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम लॉकडाऊन कालावधीत दीक्षाभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
कार्यालयीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम किंवा इतर कोणताही कार्यक्रम साजरा करताना पाच पेक्षा जास्त लोक नसतील इतक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून आणि चेहऱ्यावर मास्क किंवा कापडी मास्क परिधान करून नियमानुसार साजरा करता येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. तर देशात पाच हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.