संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन
कोरोना संसर्ग झाल्यानंतर अॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने 'टीव्ही 9 मराठी'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले.
पुणे : कोरोनाकाळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे (बुधवार 2 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. (TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Dies of COVID)
पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी टीव्ही 9 च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.
संयत पण जिगरबाज पत्रकारिता करता करता पांडुरंग यांना कोरोनाने गाठलं. लढवय्या पांडुरंग यांनी कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. मात्र ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. पांडुरंग हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
लढवय्या पांडुरंग यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या कशा पसरल्या आहेत, याकडे बोट दाखवणारी बाब आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा कितीही दावा करत असले, तरी पुण्यात व्हेंटिलेटर न मिळणं आणि त्यापेक्षा अॅम्ब्युलन्सही उपलब्ध न होणं हे सरकारी दाव्याचा फोलपणा उघडा पाडतं.
पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्रा आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.
नेमकं काय घडलं?
- पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.
- पांडुरंग रायकर यांची 27 ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह
- दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
- गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह
- रविवार 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणलं, पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.
- जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती
- रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले
- काल (मंगळवार 1 सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.
- जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचं सांगितलं गेलं.
- दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.
- पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला.
- पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
- कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
अजित पवारांकडून चौकशीचे आदेश
पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.
बेड वाढवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे प्रयत्न
पांडुरंग रायकर यांचा जीव गेला, हे निश्चित दु:खदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुण्यात लक्ष दिलं जातं आहे, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं आहे. ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे, हे खरे असले, तरी बेड कमी पडत असतील तरी ते वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटिजन टेस्ट केल्या जातात त्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.
महापौरांकडून व्यवस्थेतील त्रुटी मान्य
“पांडुरंगबाबत आम्ही सर्व जण पत्रकारांशी संपर्कात होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. रात्री बेड उपलब्ध झाला. मात्र, कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. व्यवस्थेतील या त्रुटी पांडुरंग रायकर यांना आपल्यातून घेऊन गेल्या मी हे मान्य करतो,” असे महापौरांनी सांगितले.
व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी दोष असतील, कोणतीही यंत्रणा असेल, महापालिका रुग्णालय किंवा राज्य शासनाने उभारलेले जम्बो हॉस्पिटल असेल ही जबाबदारी कोणी कोणावर न ढकलता ही स्वीकारली पाहिजे, असे महापौरांनी सांगितले.
विरोधीपक्ष नेते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे, पत्रकाराची परिस्थिती अशी असेल ती योग्य नाही, याबाबत मी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पांडुरंग रायकर यांच्या बहिणीची उद्विग्नता
“माझा भाऊ यंत्रणेच्या असुविधेमुळे गेलाय, कोटीचा प्रोजेक्ट उभा केलाय, पण अॅम्ब्युलन्स मिळाली नाही” अशी उद्विग्नता पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केली. घरचा डबा दादापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “रुग्णालयाने तुम्ही रुग्णाला घरचे जेवण देऊ शकता, असे सांगितले. दादाला भूक लागली होती, त्याने घरचा डबा आणायला सांगितला, मी काल रात्री आठ वाजता डबा दिला, पण शेवटपर्यंत तो त्याला मिळालाच नाही, दुपारी तीन वाजता दिलेली औषधंही मिळाली नाहीत. तो ना त्याला मिळाला, ना आमच्यापर्यंत रिटर्न पोहोचला. मी 20-25 वेळा डॉक्टरांना विचारले” असेही पांडुरंग रायकर यांची बहीण म्हणाली.
राजकीय क्षेत्रातील दिग्गजांकडूनही श्रद्धांजली
पुण्यातील तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले.या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) September 2, 2020
टीव्ही 9 @TV9Marathi चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे आपल्यातून अकस्मात निघून जाणे हे मनाला अतिशय वेदना देणारे आहे. माझी भावपूर्ण श्रद्धांजली! कुटुंबीय आणि आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/E3pDWg0msm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2020
.@TV9Marathi वृत्तवाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे #Covid19 मुळे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी काम करताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. pic.twitter.com/hu5ZUIRCVg
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 2, 2020
नगर जिल्ह्याचे सुपुत्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याच्या बातमीने सुन्न झालोय. त्याच्यासाठी सर्व मित्र झटत होते, पुण्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना हाॅस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत, खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली खरी पण… माफ कर मित्रा,आम्ही तुला वाचवू शकलो नाही. pic.twitter.com/7qoYYP6uia
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 2, 2020
अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र, @TV9Marathi चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे कळले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! पत्रकार बांधवांनो, या संकटाच्या काळात काम करत असताना स्वतःच्या आरोग्यची काळजी घ्या. तुम्ही समाजाचा फार महत्त्वाचा घटक आहात. pic.twitter.com/BWUqWLxGez
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) September 2, 2020
पुण्यातील तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले. एक अतिशय उमदा, मनमिळावू आणि अभ्यासू पत्रकार म्हणून ते परिचित होते.या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण रायकर कुटुंबीयांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.@TV9Marathi pic.twitter.com/MjJbi6W1zn
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 2, 2020
TV 9 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळं निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. मी रायकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
माझ्या सर्व पत्रकार मित्रांनाही माझी विनंती आहे की, बातमीवर तुमचं प्रेम आहेच पण स्वतःचीही तेवढीच काळजी घ्यावी. pic.twitter.com/DNfgvzi2Km
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 2, 2020
‘@TV9Marathi चे उमदे तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याचे कळले. मुंबईला जाता येता अनेकदा आमची भेट व्हायची.एक चांगला मित्र आणि अभ्यासू पत्रकार मनाला चटका लावून गेला.रायकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.पांडुरंगाला ईश्वर चिर:शांती प्रदान करो.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/rbTnqK5D5J
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 2, 2020
टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे आज दुःखद निधन झाले. आम्ही सर्वजण रायकर यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली ! pic.twitter.com/7Dp3GpiHYW
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) September 2, 2020
टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी पांडुरंग रायकर याचं कोरोनामुळे निधन झाल्याचे दुखद वृत्त समजले.रायकर हे अत्यंत शांत आणि संयमी पत्रकार होते.शेती,सिनेमा,क्रीडा आणि राजकारण या विविध विषयांवर त्यांनी वार्तांकन केलं.त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही न
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) September 2, 2020
एक उमदा, तरूण पत्रकार आज महाराष्ट्राने करोनामुळे गमावला. या संकटाचे तीव्र परिणाम अशा घटनांमुळे जाणवतात. @TV9Marathi चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! पत्रकार बांधवांनो, पूर्ण खबरदारी घेऊनच आपले कर्तव्य पूर्ण करा. ?
— Sunil Tatkare (@SunilTatkare) September 2, 2020
कोरोनाकाळात सयंतपणे रिपोर्टिंग करणारे @TV9Marathi चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली ??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
दुःखद घटना !! एक उमदा, कष्टाळू आणि सतत नव्याचा शोध घेणाऱ्या पत्रकाराचे कोरोनामुळे निधन!!!@TV9Marathi चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली? आजार अंगावर काढू नका ;थोडा जरी संशय आला तर लगेच कोरोना चाचणी करा ही सर्व पत्रकारांना विनंती !!@ShivsenaComms @ShivSena pic.twitter.com/mBiBxqBpbv
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) September 2, 2020
संबंधित बातम्या :
दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप
बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प
होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ
पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश
संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन
(TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Dies of COVID)