श्रध्दाळू चोर, आधी हाजी अलीला चादर चढवायची, मग चोरीला निघायचे
मुंबई: तुम्ही अनेक चोरांना पाहिलं असेल, पण धार्मिक चोर कधी पाहिलेत का? दोन कथित श्रद्धाळू भामटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर चढवायची आणि चोरी करण्यासाठी मुंबईभर हिंडायचं हा त्यांचा धंदा उघडा पडला आहे. जमिल मोहम्मद हुसेन अन्सारी आणि यासिन शौकत अन्सारी अशी या दोन भामट्यांची नावं आहेत. ते दोघेही दिल्लीचे रहिवासी […]
मुंबई: तुम्ही अनेक चोरांना पाहिलं असेल, पण धार्मिक चोर कधी पाहिलेत का? दोन कथित श्रद्धाळू भामटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर चढवायची आणि चोरी करण्यासाठी मुंबईभर हिंडायचं हा त्यांचा धंदा उघडा पडला आहे.
जमिल मोहम्मद हुसेन अन्सारी आणि यासिन शौकत अन्सारी अशी या दोन भामट्यांची नावं आहेत. ते दोघेही दिल्लीचे रहिवासी असून, ते चोरीसाठी मुंबईत येत असत. मुंबईतील डोंगरी परिसरात दोघे लॉजमध्ये राहात. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन रेकी करायचे. कुठल्या इमारतीत वॉचमन कमी आहे, कुठे सीसीटीव्ही नाही हे लक्षात ठेवून डल्ला मारत असत.
याबाबतची तक्रार आल्यानंतर नवघर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना एक सीसीटीव्ही व्हिडीओ सापडला. इमारतीत आतमध्ये जाताना दोघे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही झूम करुन पाहिला तेव्हा आरोपींचे चेहरे लक्षात आले. अधिक तपास केला असता आरोपींना यापूर्वी 2015 मध्ये कांदिवलीतील एका प्रकरणात अटक झाल्याचं उघड झालं.
पोलिसांनी खबऱ्यांना आरोपींचे फोटो दाखवून आरोपींचा शोध घेतला. तेव्हा आरोपी डोंगरीतील एका लॉजमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जवळपास 100 लॉजवर शोध घेतल्यानंतर हे दोन्ही आरोपी सापडले.
तापसामध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी चोरी करण्यापूर्वी हाजी अलीला जाऊन, दर्ग्यामध्ये चादर चढवायचे, त्यानंतर चोरी करण्यास निघायचे. पोलिसांनी आरोपींकडून 185 ग्रॅम सोने हस्तगत केलं आहे.