युक्रेनमध्ये डॉक्टर होण्यासाठी का जातात विद्यार्थी? काय आहे तिथल्या MBBS चं वैशिष्ट्य? वाचा सविस्तर…
औरंगाबादः पैठण तालुक्यातल्या फारोळा गावातला अजिंक्य नंदकुमार जाधव सध्या युक्रेनमध्ये एबीबीएसचं (Ukraine MBBS) शिक्षण घेतोय. रशिया-युक्रेन (Russia- Ukraine war) युद्धाच्या बातम्यांनी सध्या जाधन कुटुंबात प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. 24 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांतील तणाव अधिकच विकोपाला गेला आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाल्याच्या बातमीनं अजिंक्यचे पालक व्याकुळ झाले. त्याच दिवशी रात्री त्यांचं आणि अजिंक्यचं बोलणं झालं. […]
औरंगाबादः पैठण तालुक्यातल्या फारोळा गावातला अजिंक्य नंदकुमार जाधव सध्या युक्रेनमध्ये एबीबीएसचं (Ukraine MBBS) शिक्षण घेतोय. रशिया-युक्रेन (Russia- Ukraine war) युद्धाच्या बातम्यांनी सध्या जाधन कुटुंबात प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. 24 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांतील तणाव अधिकच विकोपाला गेला आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाल्याच्या बातमीनं अजिंक्यचे पालक व्याकुळ झाले. त्याच दिवशी रात्री त्यांचं आणि अजिंक्यचं बोलणं झालं. सध्या आम्ही सुखरूप असून लवकरच इथून आम्हाला भारतात नेण्याची तयारी सुरु आहे, असं त्यानं सांगितलं. अजिंक्यसारखे औरंगाबाद, लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र, भारतातील हजारो विद्यार्थी (MBBS Student) युक्रेनमध्ये एबीसीएसचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. हा आकडा जवळपास 20 हजारांपर्यंत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS चं शिक्षण घेण्यासाठी का जातात? तिथल्या अभ्यासक्रमाचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.
सर्वात स्वस्त MBBS
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी MBBS शिकण्यासाठी जातात, याचं प्रमुख कारण म्हणजे शुल्क. तेथील खासगी कॉलेजची एमबीबीएसची फीस भारताच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. भारतात एखाद्या खासगी कॉलेजमध्ये MBBS करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. अमेरिकेत 8 कोटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातदेखील हा खर्च चार कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र युक्रेनमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये MBBS ची डिग्री 25 लाख रुपयांत मिळून जाते. त्यामुळे आपल्या देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी जातात.
MBBS च्या जागांचा तुटवडा
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी MBBS ला जाण्यामागील आणखी एक मोठं कारण म्हणजे भारतातील MBBS च्या जागांचा तुटवडा. भारतात अजूनही दरवर्षी फक्त 88 हजार MBBS च्या जागा उपलब्ध आहेत. दरवर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक विद्यार्थी दोन वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर डॉक्टरकीची प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी 88 हजारांनाच MBBS चं शिक्षण घेण्याची संधी मिळते. म्हणजेच 7 लाख विद्यार्थ्यांचं स्वप्न अर्धवट राहतं. यापैकीच काही मुलं मग युक्रेनसारख्या देशाची वाट धरतात.
युक्रेनच्या डिग्रीला मान्यता
युक्रेनमधील मेडिकलचं शिक्षण स्वस्त असलं तरीही तेथील शिक्षणाचा दर्जाही उत्तम आहे. इतर देशांच्या तुलनेत येथील अभ्यासक्रमाला विश्वमान्यता आहे. जगभरातून लाखो विद्यार्थी येथे MBBS च्या शिक्षणासाठी येतात. भारतातदेखील युक्रेनमध्ये प्राप्त झालेल्या MBBSच्या पदवीला मान्यता आहे. भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) पास झाल्यानंतर नोकरीची गॅरेंटीदेखील असते. जापोरिज्जिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, नॅशनल पिरोगोव मेमोरियल युनिव्हर्सिटी, इवानो- फ्रैंकिव्स्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी आदी तेथील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये समाविष्ट आहेत.
प्रायोगिक शिक्षण व पायाभूत सुविधांवर भर
युक्रेनमधील MBBS च्या अभ्यासक्रमात प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर देण्यात येतो. तेथील कॉलेजमधील पायाभूत सुविधादेखील उत्तम आहेत. त्यामुळेच भारतातील मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटकसहित इतर राज्यांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी जातात.
प्रवेशासाठी काय आहेत अटी?
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. यासाठी पीसीबी विषयासह 12 वीत 50% गुणांनी उत्तीर्ण आणि नीट स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. या कोर्सची फीस 3500 ते 50,00 अमेरिकन डॉलर एवढी असते.
इतर बातम्या-