US Election 2020 : राष्ट्राध्यक्षपदावर जबरदस्तीने दावा करु नका; ट्रम्प यांचा बायडन यांना इशारा
अमेरिकन अध्यक्षदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी अद्याप सुरु आहे. पेन्सिलव्हेनिया, नेवादा, आणि जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी आघाडी घेतली आहे.
मुंबई : अमेरिकन अध्यक्षदाच्या निवडणुकीत (US Presidential Election 2020) मतांची मोजणी अद्याप सुरु आहे. पेन्सिलव्हेनिया, नेवादा, आणि जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आशा मावळू लागल्या आहेत. पेन्सिलव्हेनिया, नेवादा, मिशिगन आणि जॉर्जियामधील मतामोजणीबाबत ट्रम्प यांनी न्यायालयात याचिक दाखल केली आहे. त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. जॉर्जियामध्ये बायडन 4000 मतांनी आघाडीवर आहेत. नोवादामध्येही बायडन आघाडीवर आहेत. (US Presidential Election 2020 results live)
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत जो बायडन यांना इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष कार्यालयावर चुकीच्या पद्धतीने दावा करु नये. मीदेखील असा दावा करु शकतो. याबाबतची कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे.
Joe Biden should not wrongfully claim the office of the President. I could make that claim also. Legal proceedings are just now beginning!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 6, 2020
जॉर्जियात फेरमतमोजणी
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या वाढत्या आघाडीबरोबर ट्रम्प समर्थकांचा न्यायालयात जाण्याचा विचार आणखीनच पक्का झालाआहे. अशातच आता जॉर्जियामध्ये मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यामध्ये अवघ्या काही मतांचे अंतर आहे. त्यामुळे कोणतीही शंका न ठेवण्यासाठी आम्ही जॉर्जियातील मतांची फेरमोजणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जॉर्जियाचे सचिव ब्रॅड राफेनस्पर्गरर यांनी सांगितले.
आता केवळ 4169 मतांची मोजणी होणे बाकी आहे. तर लष्करात काम करणाऱ्या जॉर्जियातील मतदारांनी टपालाद्वारे पाठवलेली मते अजूनही आलेली नाहीत. ही पोस्टल बॅलेटस शनिवारी संध्याकाळपर्यंत आली तरच ग्राह्य धरली जातील, असेही ब्रॅड राफेनस्पर्गरर यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या न्यायालयीन लढाईसाठी पैसे जमवायला सुरुवात
जो बायडेन यांची आघाडी भक्कम होत असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाने न्यायालयात जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या न्यायालयीन लढाईसाठी रिपब्लिकन पक्ष 60 दक्षलक्ष डॉलर्सचा निधी उभारणार असल्याची चर्चा आहे.
पराभूत झाले तरी ट्रम्प यांचं पक्षातील स्थान अढळ राहणार
अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना अगदी एकतर्फी विजयाचा विश्वास होता. मात्र, आता मतमोजणीदरम्यान दोघांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ 1 टक्क्याचा फरक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या मतांचा आणि आकडेवारीचा विचार केला तर ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांचं रिपब्लिकन पक्षातील स्थान अढळ राहणार आहे असंच दिसतंय.
2020 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. यासोबतच अमेरिकेच्या संसदेतही त्याची संख्या चांगली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी न्यायपालिकेतही मोठे बदल केले आहेत. सध्या अमेरिकन न्यायालयांच्या सक्रीय न्यायाधीशांपैकी एक तृतीयांश न्यायाधीशांना ट्रम्प यांनीच नियुक्त केलं आहे.
संबंधित बातम्या
US Election 2020: मतदान होऊन 3 दिवस उलटले, अमेरिकेतील निकाल कधी लागणार?
US Election : डोनाल्ड ट्रम्पना झटका, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका
US Election 2020: ‘लोकशाहीत असं होतं, धीर धरा, आपणच जिंकणार आहोत’, बायडन यांचा पुन्हा विजयी नारा
(US Presidential Election 2020 : Joe Biden should not wrongfully claim presidency says Donald Trump)