ऑस्ट्रेलिया, फ्रान्सनंतर अमेरिकाही भारतासोबत, पाकिस्तानला ठणकावलं
वॉशिंग्टन : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठा प्रहार केला. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण जगभरातील प्रमुख देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर अमेरिकेनेही भारताची बाजू घेत पाकिस्तानला ठणकावलंय. पाकिस्तानने त्यांच्याकडे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करावा, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी […]
वॉशिंग्टन : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठा प्रहार केला. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण जगभरातील प्रमुख देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर अमेरिकेनेही भारताची बाजू घेत पाकिस्तानला ठणकावलंय. पाकिस्तानने त्यांच्याकडे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करावा, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलंय. पाकिस्तानने दहशतवाद संपवला तरच दोन्ही देशांमधील संबंध चांगले होऊ शकतील, असंही ते म्हणाले.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी माईक पॉम्पियो यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पॉम्पियो यांनी भारताचं समर्थन केलंय. यावर पॉम्पियो म्हणाले, मी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांच्याशी बातचीत केली. सध्या कोणत्याही प्रकारची सैन्य कारवाई टाळून तणाव कमी करण्याबाबत त्यांना सल्ला दिलाय. सोबतच पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर वाढत असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करावी, असं सांगितल्याचं पॉम्पियो यांनी म्हटलंय.
अमेरिकेने अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. यात म्हटलंय, “की भारताकडून 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी कारवाईबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी बातचीत झाली. मी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कायम रहावी याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांना सांगितलंय. संघर्ष कोणत्याही परिस्थितीत टाळायला हवा. दोन्ही देशांनी सैन्य वापर टाळावा आणि थेट संवादाचा मार्ग अवलंबावा,” असं यामध्ये म्हटलंय.
याअगोदर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनेही पाकिस्तानला ठणकावलं होतं. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलावीत, असं दोन्ही देशांनी म्हटलं होतं. सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादापासून बचाव करण्यासाठी फ्रान्सने मान्यता देत पाकिस्तानलाही यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. फ्रान्सकडून दहशतवादाविरोधात भारताच्या बाजूने उभं राहण्याचं काम तर केलं जात आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मदतही केली जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिस पाईन यांनी एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर सक्रिय असलेल्या दहशतवादावर कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलं होतं. 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलिया सरकार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत चिंतीत आहे. ऑस्ट्रेलिया या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.