ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गरम हवा, बाथरूममध्ये गरम पाणी… रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय
भारतीय रेल्वेने काश्मीरला जोडणाऱ्या दोन नवीन ट्रेन्सची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये आलिशान सुविधा असतील. दिल्ली ते श्रीनगर आणि कटरा ते बारामुल्ला या मार्गावर धावणाऱ्या या ट्रेन्समुळे प्रवास वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. विशेष म्हणजे, कटरा ते बारामुल्ला मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेकंड क्लास स्लीपर कोचशिवाय धावणार आहे.
भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षापासून कात टाकायला सुरुवात केली आहे. रेल्वेने आपल्या सेवेत अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत. प्रीमियम ट्रेनमध्ये तर असंख्य सुविधा दिल्या आहेत. विमानापेक्षाही प्रवाशांनी रेल्वे प्रवासालाच अधिक प्राधान्य द्यावं म्हणून रेल्वेने हे काही बदल केले आहेत. आता ट्रेनच्या बाथरूमच्या अस्वच्छतेबाबतच्या समस्याही दूर झाल्या आहेत. रेल्वे एवढ्यावरच थांबली नाही तर एक अनोखा प्रयोग म्हणून ट्रेनच्या बाथरूममध्ये नळ फिरवताच प्रवाशांना गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनमध्ये रेल्वेने हिटर लावला आहे. या सुविधा सर्वच ट्रेनमध्ये मिळणार नाही. काही ठरावीक ट्रेनमध्ये ही सुविधा मिळणार आहे.
भारतीय रेल्वेने जम्मू आणि काश्मीरसाठी दोन विशेष ट्रेन सुरू करण्याची योजना तयार केली आहे. काश्मीरचा संपर्क वाढवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या नव्या दोन ट्रेनपैकी एक दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर धावेल. या ट्रेनमध्ये आरामासाठी बर्थ असतील आणि कोच उबदार ठेवण्यासाठी हिटर बसवले जातील. ही ट्रेन बर्फाने आच्छादलेले डोंगर आणि चेनाब नदीवरून जाणार आहे. म्हणजे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज (359 मीटर उंच) जवळून ही ट्रेन जाणार आहे.
सेकंड क्लासचा डब्बाच नाही
विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये सेकंड क्लास स्लीपर कोच असणार नाही. काश्मीर मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाईल, असं सांगितलं जात होतं. पण आताजम्मू आणि काश्मीरच्या कटरा ते बारामुल्ला या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
हिटर बसवणार
हिवाळ्यात सामान्यपणे ट्रेनच्या टँकमध्ये पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी या टँकमध्ये हिटर बसवले आहेत. याशिवाय, प्रवाशांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी ट्रेनच्या टॉयलेट्समध्ये गरम हवा पुरवली जाईल. देशात पहिल्यांदाच रेल्वेमध्ये अशी सुविधा देण्यात येत आहे. ट्रेनच्या लोकोपायलटच्या समोर असलेल्या काचेवर देखील हिटर बसवले जातील, जेणेकरून बर्फ वाढू नये. प्रचंड थंडीत देखील काच गरम राहील.
10 तासाचा टप्पा साडे तीन तासात
ही ट्रेन सुरू झाल्याने कटरा ते बारामुल्ला या 246 किलोमीटरच्या अंतराला फक्त साडे तीन तास लागतील. सध्या हे अंतर पार करण्यासाठी 10 तास लागतात. ही ट्रेन येत्या महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच जानेवारीत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.