Bigg Boss Marathi 2 | वीणाने पापण्यांवर कोरलं शिवचं नाव!
'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक वीणा जगतापने आयब्रो पेन्सिलच्या मदतीने पापण्यांवर शिव ठाकरेचं नाव कोरलं.
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi Season 2) च्या घरात 75 व्या दिवसाकडे वाटचाल होताना स्पर्धकांमधील चुरस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) शिव ठाकरे (Shiv Thackeray) च्या रंगात रंगताना दिसत आहे. यावेळी चक्क वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव कोरलं.
‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या नऊ स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. नॉमिनेशनपासून वाचत टास्कमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी स्पर्धकांची धडपड सुरु आहेच. सोबत वीणा आणि शिव यांच्या मैत्रीच्या सुरसकथाही पाहायला मिळत आहेत. वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव लिहिलेलं प्रोमोमध्ये दिसत आहे.
वीणाने आयब्रो पेन्सिलच्या मदतीने शिवचं नाव लिहिल्याचं दिसत आहे. आरशामध्ये बघत वीणाने शिवचं नाव पापण्यांवर कोरलं. याशिवाय त्याच्या नावाच्या बाजूला हार्ट काढल्याचंही दिसत आहे. खरं तर महेश मांजरेकर अनेक वेळा शिवला गेमकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. शिवची आई आणि बहीण यांनीसुद्धा शिवला खेळाकडे लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं.
कालच्या भागात नेहाच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडली. मात्र या कार्यात संचालक असलेल्या हीनाने टास्कचा खेळखंडोबा केल्याचं सांगत ‘बिग बॉस’ने तिला झापलं. घराबाहेर पडल्यानंतर महेश मांजरेकर यांनी रुपालीला एका सदस्याला सेफ करण्याची संधी दिली होती. त्यानुसार हातावर ‘रुपाली’च्या नावाचा टॅटू काढणाऱ्या हीनाला तिने सेफ केलं होतं. मात्र तुला इम्युनिटीचं महत्त्व नसल्याचं सांगत बिग बॉसने तिची इम्युनिटी काढून घेतली. त्यामुळे आता हीनासुद्धा नॉमिनेट होऊ शकते.
ग्रँड फिनालेमध्ये किती स्पर्धकांचा समावेश होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सहा स्पर्धकांचा समावेश महाअंतिम फेरीमध्ये होईल, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.
बिग बॉसच्या घरात आता वीणा जगताप, शिव ठाकरे, अभिजीत केळकर, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, हीना पांचाळ आणि आरोह वेलणकर हे आठ सदस्य आहेत. अभिजीत बिचुकले यांना पुढील आदेशापर्यंत पाहुण्याची भूमिका देण्यात आली आहे. त्यांना अद्याप बिग बॉसकडून सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आलेला नाही.