Viral Video : भरगच्च रिक्षा पोलिसांनी थांबवली, रिक्षातून उतरले तीन-चार नव्हे, 24 जण!
तेलंगणामध्ये वाहतूक पोलिसांनी एक भरगच्च रिक्षा थांबवली असता, त्यामधून एक-एक करुन तब्बल 24 जण उतरले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video हैदराबाद : आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना गाडीत भरल्यास अपघाताला निमंत्रण मिळू शकतं, असा इशारा वाहतूक पोलिसांकडून वारंवार दिला जातो. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आपल्याकडे नवीन नाही. तेलंगणामध्ये (Telangana Rickshaw) सहाआसनी रिक्षात दाटीवाटीने भरलेल्या काही प्रवाशांना वाहतूक पोलिसांनी थांबवलं आणि पुढे जे घडलं, ते बघून तुमचीही बोटं तोंडात जातील.
तेलंगणातील करिमनगर पोलिस आयुक्तांनी ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘लोकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वतःच घ्यावी. भरलेल्या ऑटोरिक्षामध्ये बसू नये’ असं आवाहन हा व्हिडीओ शेअर करताना पोलिसांनी केलं आहे.
हा व्हिडीओ खरं तर डोळ्यात अंजन घालण्याच्या उद्देशाने शेअर करण्यात आला आहे. मात्र तो पाहून हसावं की रडावं, अशी काहीशी आपली स्थिती होती. दाक्षिणात्य भाषा तुमच्या डोक्यावरुन जात असली, तरी हा व्हिडीओ दृष्य स्वरुपात बोलका आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
तिम्मापूरमधील एका सहाआसनी रिक्षाला वाहतूक पोलिसांनी अडवलं. एकीकडे आसन क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसवल्याबद्दल पोलिस त्याला फैलावर घेत होते. व्हिडीओ शूट करत करत रिक्षाचालकाची चौकशी सुरु होती. त्याचवेळी पोलिसांनी एक-एक करुन प्रवाशांना उतरायला सांगितलं. प्रवाशांचं काऊण्टडाऊन काही केल्या थांबायचं नाव घेईना.
प्रामुख्याने महिला प्रवासी या रिक्षात बसल्या होत्या, तर चिमुरडी पोरं त्यांच्या मांडीवर किंवा जागा मिळेल तिथे सामावून गेली होती. आधी हाताच्या बोटांवर मावतील, इतके प्रवासी असल्याचं पोलिसांनी वाटलं. मात्र रिक्षातून उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या काही संपेना. एकामागून एक, एकामागून एक महिला आणि लहानगी उतरतच होती.
सर्व जण उतरुन झाल्यावर संख्या मोजली तेव्हा ती भरली आठ-दहा नव्हे, पंधरा-वीस नाही, तर तब्बल 24! दोन दिवसात या व्हिडीओला पाचशेच्या घरात रिट्वीट्स मिळाले आहेत, तर जवळपास 25 हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
People should take care of their own safety. They shouldn’t board in overcrowded passenger autos unmindful of their safety pic.twitter.com/Aul2l2LM7C
— CP KARIMNAGAR (@cpkarimnagar) August 11, 2019
गेल्याच आठवड्यात तेलंगणातील महबूबनगरमध्ये बारा कामगारांनी भरलेल्या रिक्षाला ट्रकने धडक दिल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाला होता. एकीकडे रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने कठोर नियम आखत दंड वाढवण्याची तरतूद असलेलं मोटार वाहन दुरुस्ती विधेयक राज्यसभेत पास झालं, तर दुसरीकडे निर्ढावलेल्या रिक्षाचालकांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरुच ठेवला आहे.