पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी विराट कोहलीला दंड
विराट कोहलीच्या घरी मात्र गाडी धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या अपव्यय सुरु असल्याचं तक्रारी काही जणांनी पालिकेत दाखल केली.
गुरुग्राम (हरियाणा) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी गुरुग्राम नगरपालिकेने दंड ठोठावला आहे. पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरल्यामुळे विराट कोहलीला 500 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
हरियाणातील गुडगावमधील डीएलएफ फेस 1 मध्ये विराट कोहलीचा बंगला आहे. या बंगल्यात विराटच्या 2 SUV गाड्यांसह इतर गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या धुण्यासाठी दररोज जवळपास 1 हजार लीटर पाणी वापरले जाते. विशेष म्हणजे विराटच्या या गाड्या पिण्याच्या पाण्याने पाईप लावून धुतल्या जातात. यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे अनेकांनी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली होती.
महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी भीषण दुष्काळ पडला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.
विराट कोहलीच्या घरी मात्र गाडी धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय सुरु असल्याचं तक्रारी काही जणांनी पालिकेत दाखल केली. यानंतर गुरुग्राम नगरपालिकेचे आयुक्त यशपाल यादव यांनी विराटच्या घरी जाऊन याबाबत नोटीस पाठवली. तसंच या प्रकरणी विराटच्या घराची देखरेख करणाऱ्या दीपकला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी कोहलीसह परिसरातील आणखी १० जणांना दंड ठोठावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.