खराखुरा सिंघम, महिलेला स्वत:च्या बाईकवर बसवून दीड लाखाचे दागिने शोधले
वाशिम : वाशिममधील एका कर्तव्यदक्ष पोलिसांने सतर्कतेचा आदर्श दाखवून दिला. महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गजानन काळे या पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने पकडलं. यवतमाळ-गंगापूर बसमध्ये प्रवास करणाऱ्या दीपाली आखाडे या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम पर्ससह चोरीला गेले होते. दीपाली खाडे डोणगाव जि.बुलडाणा येथून मुलगी समृद्धी वय 10 वर्षे […]
वाशिम : वाशिममधील एका कर्तव्यदक्ष पोलिसांने सतर्कतेचा आदर्श दाखवून दिला. महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गजानन काळे या पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने पकडलं.
यवतमाळ-गंगापूर बसमध्ये प्रवास करणाऱ्या दीपाली आखाडे या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम पर्ससह चोरीला गेले होते. दीपाली खाडे डोणगाव जि.बुलडाणा येथून मुलगी समृद्धी वय 10 वर्षे आणि अर्पिता वय दीड वर्षे यांना घेऊन गंगापूर-यवतमाळ बसने प्रवास करत होत्या. त्याच बसमध्ये पडदे विक्रीचे काम करणाऱ्या दोन महिला होत्या.
दरम्यान, दीपाली आखाडे या बसच्या वाहकाकडून तिकीट घेण्यासाठी पर्समधून पैसे काढत असताना, पर्समध्येच असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांची नजर गेली. त्यांनी त्यावर पाळत ठेवली आणि संधी मिळताच दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली.
मालेगाव इथे दीपाली यांच्यासह चोरट्या महिलादेखील बसमधून उतरुन निघून गेल्या. काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दीपाली यांच्या लक्षात आली. त्या सैरावैरा धावत होत्या. कावऱ्या बावऱ्या नजरेने लोकांना न्याहळत होत्या. त्यांची ही अवस्था ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी गजानन काळे यांच्या लक्षात आली. त्यांनी विचारपूस करुन माहिती घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दीपाली आखाडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलींना पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर दीपाली यांना दुचाकीवर बसवून मालेगावच्या बाजारात चोरट्या महिलांचा शोध घेण्यास सुरु केलं.
सुदैवाने दोन्ही चोरट्या महिला एका बोळीत बसलेल्या आढळून आल्या. गजानन काळे यांनी दोघींकडे खड्या आवाजात चौकशी करताच, दोघींनीही चोरीची कबुली देत, दागिने आणि पैसे परत केले. गजानन काळे यांनी दाखवलेले प्रसंगावधान पाहून त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.