आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके! राजू शेट्टींची खंत, भविष्यात आघाडी करायची की नाही, निर्णय लवकरच!
भाजप काळात सदाभाऊ खोत आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या वर्तनामुळे आपण अतिशय दुःखी असून यापुढे आघाड्यांमध्ये सहभागी व्हायचं की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
वाशिमः आम्ही काही विशिष्ट हेतूनं काही अटींवर आघाड्यांमध्ये जात असतो. आघाडीमध्ये गेल्यानंतर जे सत्तेत येत असतात, त्यांना सत्तेची गुर्मी येते. मस्ती येते. त्यातून आमचेच कच्चे दुवे.. आमचेच कच्चे मडके त्यांच्या हाताला लागतात. भाजप काळात सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या वर्तनामुळे आपण अतिशय दुःखी असून यापुढे आघाड्यांमध्ये सहभागी व्हायचं की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या कामकाजापासून आमदार दूर आहेत, त्यामुळे ही कारवाई झाली आहे. येत्या पाच तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हे ठरवलं जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. आमदार देवेंद्र भोयर यांना तिकिट मिळवून देण्यापासून आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू घेतली नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके…
कोणत्याही पक्षासोबत आघाडीत सामिल झाल्यावर अपयश हाती येतं, यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘ आम्ही काही विशिष्ट हेतूनं काही अटींवर आघाड्यांमध्ये जात असतो. आघाडीमध्ये गेल्यानंतर जे सत्तेत येत असतात, त्यांना सत्तेची गुर्मी येते. मस्ती येते. त्यातून आमचेच कच्चे दुवे.. आमचेच कच्चे मडके त्यांच्या हाताला लागतात ही दुर्दैवाने गोष्ट खरी आहे..आणि यापूर्वीसुद्धा असेच घडले आहे. आणि त्यामुळेच येत्या पाच तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आता भविष्यामध्ये अशा आघाड्या करायच्या की नाही करायच्या या संदर्भात निर्णय घेणार आहोत, असे राजू शेट्टी म्हणाले.
देवेंद्र भुयारांनीही साथ दिली नाही… राजू शेट्टींची खंत
स्वाभिमानी शेतकरी संघटना शिस्तबद्ध आहे. कोण कितीही मोठं, असलं तरी फरक पडत नाही. आमदार भुयार यांची जागा सुटावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी- स्वाभिमानी संघटनेने युती केल. यासाठी मला प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. वरूडची जागा मिळाली नाही तर आघाडी तोडायची धमकी मी दिली होती. अजित पवार जागा सोडायला तयार नव्हते. जागा पाडायची तयारी त्यांनी केली होती. एवढं सगळं केल्यानंतर तोच देवेंद्र भोयर निवडून आल्यानंतर त्यांना गोड वाटायला लागला आहे. तो निवडून आल्यानंतर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या एकाही कार्यक्रमात आलेला नाही. सरकारसोबत आमचे अनेकदा संघर्ष झाले. महाविकास आघाडीत असलो तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आम्ही आवाज उठवतो. सरकारविरोधी भूमिका घेतो. तेव्हा हा आमदार सरकारची बाजू घेतो, अशी खंत राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली.
देवेंद्र भुयारांची फेसबुक पोस्ट काय?
दरम्यान, देवेंद्र भुयार यांनीदेखील फेसबुकवर धन्यवाद अशी पोस्ट लिहून पक्षातून आपण बाहेर पडत असल्याचे संकेत दिले होते. विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले.
इतर बातम्या-