नाशिकला पावसाने झोडपलं, पण मालेगावात भीषण पाणीटंचाई
सध्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक धरणं भरली आहेत. मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने, धरणातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.
नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक धरणं भरली आहेत. मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने, धरणातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. मालेगाव शहराला 80% पाणी पुरवठा गिरणा धरणातून होतो. पण सध्या गिरणा धरणात फक्त 7 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील काळात पाऊस न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मात्र जिल्ह्याच्या मालेगाव, सटाणा, नांदगाव तालुक्यात अद्यापही समाधान कारक पाऊस न झाल्याने, तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा आतापर्यंत मालेगाव तालुक्यात केवळ 61 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत 84 मिमी पाऊस झाला होता.
मालेगाव शहराला ज्या गिरणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्याने तळ गाठला आहे. त्यामध्ये फक्त 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून 10 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकंच पाणी असल्यामुळे शहराला सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पुढील काळात समाधान समाधानकारक पाऊस न झाल्यास त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी सचिन मालवाल यांनी सांगितले.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत असून अद्यापही समाधान कारक पाऊस झालेला नाही. पुढील काळात चांगला पाऊस होऊन पाणी टंचाईचे संकट दूर होईल, अशी आशा मालेगावकर करत आहेत.