ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण हाऊसफुल
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर यासारख्या मुख्य शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतीना पाणी पुरवठा केला जातो.
बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार हे धरण शंभर टक्के भरलं आहे. काल संध्याकाळी 5 च्या सुमारास हे धरण काठोकाठ भरुन वाहू लागले. बारवी धरणाची पूर्वीची क्षमता ही 68.60 मीटर होती. त्यानंतर नुकतंच या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आली असून ती 72.60 मीटरपर्यंत करण्यात आली आहे.
त्यामुळे यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणी साठा जमा होणार आहे. तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमता 234 दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ही क्षमता वाढून 340.48 दशलक्ष घनमीटर इतकी होणार आहे .