H-1B Visa नियमात जाचक बदल, भारतीयांची धाकधूक वाढली
न्यूयॉर्क : एच वन बी व्हिजाचे नियम अमेरिकेत काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. अमेरिकेने यावर्षी H-1B Visa च्या संख्येत फक्त कपातच केलेली नाही, तर नियमही कठोर केले आहेत. या कठोर नियमांमुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या पाच लाख भारतीय कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची सध्या चिंता काय आहे […]

न्यूयॉर्क : एच वन बी व्हिजाचे नियम अमेरिकेत काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. अमेरिकेने यावर्षी H-1B Visa च्या संख्येत फक्त कपातच केलेली नाही, तर नियमही कठोर केले आहेत. या कठोर नियमांमुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या पाच लाख भारतीय कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची सध्या चिंता काय आहे आणि नियमात कोणते बदल झाले आहेत, यासाठी टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षक आणि वाचक अखिला रेड्डी यांनी थेट अमेरिकेतून लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी भारतीयांच्या भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
काय आहे H-1B Visa?
H-1B Visa आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. H-1B Visa हा अमेरिकेकडून दिला जाणारा एक अस्थलांतरित व्हिजा आहे. अमेरिकेच्या स्थलांतर आणि राष्ट्रीयत्व कायदा कलम 101(a) (17)(H) नुसार हा व्हिजा दिला जातो. या कायद्यांतर्गत अमेरिकन कंपन्या परदेशातील विशेष क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांना नोकरी (सहा वर्षांसाठी) देऊ शकतात.
H-1B Visa चे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे एकतर तुम्ही अमेरिकेतील विद्यापीठातून किंवा शासनमान्य संस्थेतून उच्चशिक्षण किंवा पदवी पूर्ण केलेली आवश्यक आहे. तर दुसरं म्हणजे कामाच्या अनुभवावर आधारित H-1B Visa दिला जातो.
H-1B Visa साठी विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. अमेरिकेत याला STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) असंही म्हटलं जातं.
H-1B Visa चं महत्त्व
अमेरिकेतील ऑक्टोबर 2018 च्या अधिकृत माहितीनुसार, एकूण चार H-1B Visa धारकांपैकी तीन जण हे भारतीय आहेत. अमेरिकन नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा (USCIS), 5 ऑक्टोबर 2018 पर्यंत H-1B Visa वर काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांची संख्या 4 लाख 19 हजार 637 एवढी होती. यापैकी तब्बल 3 लाख 9 हजार 986 भारतीय आहेत.
H-1B Visa ही भारतीय विद्यार्थी, ज्यांना अमेरिकेत नोकरी करायची आहे, अशांसाठी सुवर्ण संधी असते. येत्या आर्थिक वर्षात H-1B Visa साठी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत जाऊन काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पाहणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
H-1B Visa ची आवश्यकता
H-1B Visa ला अमेरिकेचं “America’s Secret Weapon” असंही म्हटलं जातं. कारण, या व्हिसाच्या आधारे जगभरातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नोकरी मिळते. भारतीयांमध्ये अमेरिकेत काम करण्याचं आकर्षण आहे. यासाठी H-1B Visa ही सर्वात मोठी गरज आहे. H-1B Visa मिळवण्यासाठीची धडपड ही तीन कारणांसाठी केली जाते.
एक म्हणजे अमेरिकन ग्रीन कार्डसाठी अर्ज (अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व)
H-1B Visa धारक त्यांची पत्नी किंवा मुलांना अमेरिकेत आणू शकतात.
तिसरं म्हणजे ग्रीन कार्डला परवानगी मिळाल्यास भारतीय कर्मचाऱ्याच्या पत्नीला H-4 EAD Visa मिळतो, ज्यामुळे अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते.
अमेरिकेतील अहवालांनुसार, भारतीयांकडून H-1B Visa ची सर्वात जास्त मागणी आहे. संबंधित क्षेत्रामध्ये कुशल कर्मचारी आणि तज्ञ जास्त असल्यामुळे हा आकडा जास्त आहे.
सध्याची परिस्थिती काय?
सध्याच्या परिस्थितीनुसार अमेरिकेतील भारतीयांमध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे H-1B Visa मुळे अमेरिकेतील स्थानिकांना नोकरी मिळत नाही/स्थानिकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे, ट्रम्प सरकार H-1B Visa ची संख्या कमी करणार आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा अमेरिकेतील भारतीयांमध्ये आहेत. नव्या नियमांनुसार H-1B Visa लॉटरी पद्धतीने दिला जाणार आहे. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांसाठी हा चिंतेचा विषय बनलाय. H-1B Visa नाकारण्याची टक्केवारी सध्या 65 टक्के आहे, यात आणखी वाढ होऊ शकते.
आणखी काही नवे बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. H-1B साठीचं शुल्क वाढलं आहे. 23 डिसेंबर 2016 च्या तुलनेत एका H-1B अर्जाची फी 460 अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली आहे, जी 325 डॉलर होती. वर्षाला एकूण 85 हजार H-1B Visa देण्याचा नियम आहे. USCIS च्या मते, 85 हजार विद्यार्थ्यांना H-1B visa एकदा दिल्यानंतर परत कोणताही परदेशी विद्यार्थी त्यासाठी अर्ज करु शकत नाही. ही संख्या 65 हजारांवर आणली जाऊ शकते.
भारतीयांच्या अपेक्षा काय?
H-1B Visa ची संख्या वाढणं ही साधारण अपेक्षा आहे. पण कठीण मेहनत करुन ज्यांनी अमेरिकेत शिकण्याचं स्वप्न पाहिलंय, त्यांच्यासाठी मात्र ही निराशा आहे. लॉटरी पद्धतीने H-1B Visa देण्याचा नियम अमेरिकेकडून काढण्यात आलाय. अमेरिका आणि भारताचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा शासकीय स्तरावरुन देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. तरीही H-1B Visa मिळणं हा नशिबाचा खेळ होणार आहे.