मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (What Is Happening In World). कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याशिवाय या दरम्यान, जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (What Is Happening In World)
1. पाकिस्तानात तब्बल 4 लाख माजी सैनिकांचे पेन्शन चक्क ‘भूतं’ घेत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला आहे. कोरोनाच्या साथीमुळे तिथल्या एका सैन्य विभागानं माजी सैनिकांना घरोघर जाऊन पेन्शन देण्याची योजना आणली. मात्र त्यापैकी अनेकांची नाव फक्त कागदांवरच अस्तित्वात होती. त्यामुळे तिथल्या माध्यमांनीच या प्रकरणाला ‘भूत पेन्शन’ असं नाव दिलं आहे. सध्या या सर्व प्रकरणाच्या शोधासाठी एक कमिटी बनवली गेली आहे. ‘नवभारत टाईम्स’नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होणारे ते जगातले तिसरे पंतप्रधान आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही माहिती दिली. रशियात सध्या 1 लाख 14 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. कोरोनाबाधित देशांच्या यादीत रशियाचा क्रमांक सध्या आठव्या स्थानावर आहे.
3. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. लॉकडाऊन घोषित करुनही पाकिस्तानात परिस्थिती बिकट होत चालली आहे. मात्र, अशा परिस्थितीत इम्रान खान भारताला सल्ला द्यायला विसरले नाहीत. या सल्ल्यादरम्यान त्यांनी वापरलेल्या भाषेवर टीका होत आहे.
4. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये प्रत्येक दिवसाला 1 लाख चाचण्या केल्या जाणार असल्याचा दावा तिथल्या सरकारनं केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना पसरला तेव्हा एका आठवडयात फक्त 5 हजार लोकांच्या चाचण्या करण्याची व्यवस्था होती. दरम्यान, कोरोनामुळे आलेला ब्रिटनवरचा वाईट काळ निघून गेल्याचा विश्वास पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.
5. पिझ्झाच्या बॉक्समधून अनेक देशांमध्ये ड्रग्स आणि शस्रांची डिलिव्हरी सुरु आहे. डेलीमेलनं यासंदर्भात बातमी दिली आहे. ब्रिटन, आयरलँड, मलेशिया आणि स्पेन या देशात फूड डिलिव्हरीद्वारे चैनीच्या वस्तू पुरवल्या जाता आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असलं तरी या देशांमध्ये ड्रग्स आणि शस्रविक्रीत कोणतीही घट आलेली नाही.
6. दिल्लीत एका तरुणीवरुन दोन तरुणांनी एकमेकांवर चाकूनं वार केलेत. मात्र त्यापैकी दवाखान्यात भर्ती झालेला एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्यानंतर दुसरा तरुण, आणि जिच्यावरुन भांडण झालं ती तरुणी या तिघांना क्वारंटाईन केलं आहे. इतकंच नाही तर चाकू हल्ल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जे पोलीस या दोन्ही तरुणांच्या संपर्कात आले, त्या पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ‘नई दुनिया’नं ही बातमी दिली आहे.
7. कोरोनाग्रस्तांच्या यादीत चीन आता पहिल्या 10 देशांमध्येसुद्दा नाही. कोरोना फैलावाचे पहिले दोन महिने चीनमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, आता चीन कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत 11 व्या स्थानावर गेला आहे. इराण, ब्राझिल, तुर्की आणि रशिया या देशांनी कोरोनाबाबतीत चीनला मागे टाकलं आहे.
8. दक्षिण चीनच्या समुद्रातून अमेरिकन जहाजांना हुसकावून लावल्याच्या दावा चीननं केला आहे. त्यानंतर मात्र अमेरिकेनं गस्त घालण्यासाठी बॉम्बवर्षाव करणारं विमान पाठवल्याची माहिती आहे. जगभर कोरोनाचं संकट असताना चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधला तणाव मात्र दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
9. केरळमधल्या एका गावात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काही लोक मास्कबरोबरच छत्री वापरु लागले आहेत. छत्रीमुळे आपोआप दोन लोकांमधलं अंतर वाढतं. या गावानं अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी जो बाहेर पडेल, त्याला छत्रीचा वापर सक्तीचा केला आहे. त्याबरोबरच एकमेकांच्या छत्रीला स्पर्श न करण्याचा नियमही घालून देण्यात आला आहे.
10. कोणतेही लक्षणं नसताना कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या चीनमध्ये वाढू लागली आहे. लक्षणं नाहीत, पण कोरोना आहे. अश्या लोकांची संख्या आता 981 इतकी झाली आहे. त्यामुळे त्या लोकांवर चीनचं प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.
11. जर्मनीत मैदानं, चर्च, संग्रहालयं लवकरच सुरु केली जाणार आहेत. मात्र रेस्टॉरंट, हॉटेल उघडण्याची परवागनी दिली गेलेली नाही. जर्मनीत लाखांच्या वर कोरोनाबाधित असले, तरी सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे.
12. भारत-नेपाळ सीमेलगत अडकलेले 2 हजार मजूर नेपाळला परतले आहेत. नॅशनल न्यूज एजेंसी ऑफ नेपाळनं ही माहिती दिली आहे. लॉकडाऊनपासून नेपाळमधले मजूर भारताच्या शहरांमध्ये अडकून पडले होते.
13. कोरोनाचं संकट असताना चीननं मात्र एव्हरेस्टवीरांना 5-जी नेटवर्क पुरवण्यासाठी नवी योजना आखली आहे. चीननं त्याच्या हद्दीतल्या बेसवर टॉवर सुद्धा उभे केले आहेत. त्यामुळे एव्हरेस्टवीरांना आता नेटवर्कसुद्धा उपलब्ध होणार आहे. ‘सिन्हुवा’ या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे.
14. कोरोना विषाणू चीनमधल्या वुहानच्याच लॅबमधून बाहेर पडल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. मात्र मी ते जाहीर नाही करु शकत, असंसुद्दा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ