मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम. कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, मात्र अभिनेता कुशल बद्रिकेने सध्या ‘चला..’च्या मंचावर एक वेगळंच मिशन हाती घेतलं आहे. ते म्हणजे ‘सुनैना बद्रिके यांचे कथक क्लासेस’च्या जाहिरातीचं (Sunaina Badrike Kathak Classes).
सुनैना या कुशल बद्रिकेंच्या मिसेस आहेत, हे तर साहजिकच. पण प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे, की सुनैना बद्रिके नेमक्या दिसतात कशा, करतात काय, त्यांचं कुशल बद्रिकेशी सूत कसं जुळलं? कारण व्यक्तिरेखा कोणतीही असली, तरी कुशल बद्रिके न चुकता ‘सुनैना बद्रिके यांचे कथक क्लासेस’ची जाहिरात करतो. कधी कोणता विषय तो नृत्याकडे नेईल, याचा भरोसा नाही. मंगळवारच्या भागात तर तो चक्क सुनैना बद्रिकेंच्या कथक क्लासेसच्या जाहिरातीचा कागद पाठीवर चिकटवून डान्स करत आला.
कुशल आणि सुनैना यांचं लव्ह मॅरेज झालं. सुनैना देखील कला क्षेत्रातल्याच. आपली आवड जपत त्यांनी कथक क्षेत्रातील प्रवास (Sunaina Badrike Kathak Classes) सुरु ठेवला आहे. ठाण्यात सुनैना बद्रिके यांचा कथक क्लास आहे. ‘चला हवा..’च्या मंचावरही त्यांनी हजेरी लावली होती. नुकतंच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्येही त्यांनी परफॉर्मन्स दिला होता.
कशा जुळल्या रेशीमगाठी?
साधारण 25 वर्षांपूर्वीची गोष्ट. कुशल अंबरनाथला एका कॉलेजमध्ये शिकत होता. तेव्हा खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत त्याचं नाव कोणीतरी जबरदस्तीने टाकलं. आज कोणतीही व्यक्तिरेखा लीलया पेलणारा कुशल तेव्हाही कसलेला होता. तोपर्यंत त्याने 50-60 एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता. तो संपूर्ण कार्यक्रम त्याने पाहिला. त्यात ‘ती फुलराणी’मधला एक पॅच सादर करणारी तरुणी कुशलचं लक्ष वेधून घेत होती.
बक्षिस समारंभाचा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा त्या तरुणीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. तर कुशलला संपूर्ण एकपात्री स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. मात्र दोघांची भेट काही झाली नाही.
काही वर्षांनी डोंबिवलीच्या एका ग्रुपने कुशलला सोबत काम करण्यासाठी विचारणा केली. योगायोगाने सुनैना त्या एकांकिकेत होती आणि बोनस म्हणजे ती कुशलच्या बायकोच्या भूमिकेत होती. तिच्याबरोबर काम करताना कुशलला खूप छान अनुभव आला. आपलं चांगलं ट्युनिंग जमेल हे तेव्हा कुशलच्या लक्षात आलं होतं.
घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न
हळूहळू दोघांच्या भेटी वाढायला लागल्या. प्रेम फुलायला लागलं. आश्चर्य म्हणजे सुनैना यांनी कुशलला लग्नासाठी विचारलं आणि त्याने तिला होकार दिला. घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला नकार होता. कलाकार कसं घर सांभाळणार, असा त्यांचा प्रश्न. त्यात सुनैना 90 टक्के गुण मिळवणाऱ्या, तर कुशल जेमतेम 50 टक्के. सुनैना यांचे वडील बँकेतून ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले, तर आई शाळेत मुख्याध्यापिका होत्या. मात्र सुनैना कुशलच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या आणि दोघांचं शुभमंगल झालं.