केदारनाथ मंदिरातून गायब झालेले 228 किलो सोने गेले कुठे? मुख्यमंत्री धामी यांनी दिली महत्वाची माहिती
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब असल्याचा आरोप केला होता. त्यावरून मुख्यमंत्री धामी यांनी मोठी माहिती दिली आहे.
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे यांचा विश्वासघात केल्याची टीका करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिंदे गटावर आरोप केला होता. याचवेळी त्यांनी केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब असल्याचागी गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपांनंतर आता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी माहिती दिली आहे. तसेच, चार धामांच्या नूतनीकरणात केलेल्या योगदानाबद्दल धामी यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले आहेत.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या आरोपानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, अविमुक्तेश्वरानंद यांनी लावलेले सर्व आरोप वस्तुस्थिती पलीकडे आहेत. मंदिराची उभारणी आणि त्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून आजपर्यंत इतके सोने मंदिरात आलेले नाही. त्यांनी फक्त अंदाज दिला आहे. स्वामी यांनी जो अंदाज दिला त्यापैकी एक चतुर्थांश सोनेही मंदिरात आले नाही. मला या विषयावर जास्त बोलायचे नाही. कारण मंदिर समितीच्या संतांनीही त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनीही हा आरोप वस्तुस्थितीच्या पलीकडे सांगितला आहे. बाबा केदारनाथ यांचे ते निवासस्थान आहे आणि जर कोणी बाबांच्या घरी असे कृत्य केले तर तो बाबांच्या नजरेतून सुटू शकत नाही, असे मुख्यमंत्री धामी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या एका बनावट व्हिडिओमुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. मुख्यमंत्री यांचा डीप फेक व्हिडिओचे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आले आहे. या प्रकरणावर लोक वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. हे सत्य असेल तर हा प्रकार समाजासाठी धोकादायक ठरू शकतो असे लोक म्हणत आहेत. या प्रकरणातील आरोपी तरुणांविरुद्ध पोलिसांच्या कारवाईसाठी आणि विरोधात इंटरनेट मीडियावर पोस्ट्सची गर्दी झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत फेक व्हिडिओचे विविध राज्यांमध्ये डझनभर गुन्हे दाखल झाले आहेत. सखोल बनावट व्हिडीओद्वारे घटनात्मक पदांवर बसलेल्या राजकारण्यांची प्रतिमा डागाळण्याचाही प्रयत्न केला जात आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा असाच खोटा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. काशीपूर येथील रुग्णालयाच्या एमडीने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुण आयुष रावत याला चौकशीसाठी बोलावले. या प्रकरणी केंद्र सरकारने जारी केलेल्या सल्ल्यानुसार कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.