पाऊस आल्यावर लाईट का जाते आणि महावितरणला कसं समजतं?
वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वादळ वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटणाऱ्या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली चिनी मातीची विद्युत उपकरणे.
मुंबई : चार महिने प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर प्रत्येक जण पावसाची वाट पाहतो. पण पाऊस येताच सर्वात मोठी समस्या म्हणजे वीज गायब होते. पहिल्या पावसानंतर अनेकांनी वीज गेल्याचा अनुभव घेतला असेल. त्यामुळे पावसाचा आनंद असला तरी वीज गेल्यामुळे मोठी अडचण सहन करावी लागते. पाऊस आल्यानंतर लगेचच वीज का जाते, यानंतर महावितरणचे कर्मचारी काय करतात याबाबतचा आढाव टीव्ही 9 मराठीने घेतलाय.
वीज गायब होण्याची कारणं काय?
राज्यात वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण ही प्रमुख सरकारी कंपनी आहे. ग्रामीण भागासह अनेक मोठ्या शहरांमध्येही वीज गेल्याचा अनुभव येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे किंवा मोठ्या पावसामध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. हेच प्रमाण इतर ऋतूंमध्ये कमी असतं. वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वादळ वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटणाऱ्या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली चिनी मातीची विद्युत उपकरणे. बऱ्याचदा अधिकचा भार एखाद्या रोहित्रावर आल्यामुळेही प्रवाह खंडित होतो. पशु-पक्षांच्या स्पर्शाने किंवा धक्क्याने देखील अनेकदा वीज जाते. तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते.
वीज गेल्यानंतर महावितरणचे कर्मचारी काय करतात?
वीज गेल्यानंतर घरातली सर्व उपकरणं बंद पडतात आणि सर्व राग निघतो तो महावितरणवर. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, अगदी याच वेळी लाईनमन आणि कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. मग तो दिवस असो की रात्र, पाऊस असो कि ऊन.
तुमच्या भागातली वीज गेल्याचं कसं समजतं?
विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे अनेक आहेत. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याबरोबर तो नेमका कुठे झाला असावा याचा अंदाज लाईनवर नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतो. कारण, दररोज तपासणी आणि टेहाळणी करताना लूज काँटॅक्ट, स्पार्किंग, झाड किंवा फांदी तारांना घासते का, पशु किंवा पक्ष्यांचा विद्युत तारांना स्पर्श होऊ शकतो, कोणत्या पोलवर उपकरणे निकामी झाली आहेत, कमकुवत झाली आहेत, हे सर्व त्या त्या भागातील लाईनमन आणि त्यांच्या सहाय्यकाना अंदाज असतो.
जेव्हा विद्युत पुरवठा खंडित होतो, तो कोणत्याही कारणाने होवो, त्याची माहिती लगेच त्या भागातील सबस्टेशनमधील विद्युत नियंत्रण यंत्रावर कळते. अलार्म वाजायला सुरुवात झाली की कोणत्या फीडरवर प्रवाह खंडित झाला याची अचूक माहिती मिळते. सबस्टेशनला रात्र-दिवस नियुक्त असलेले ऑपरेटर मग लगेच याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि त्या-त्या भागातील लाईन स्टाफ यांना देतात. नियमाप्रमाणे प्रवाह खंडित झाल्यानंतर पाच मिनिटांनी ऑपरेटर सबस्टेशनच्या यंत्रावरून पहिला ट्रायल घेतात. त्या नंतरही सप्लाय टिकला नाही तर दुसरा प्रयत्न दहा मिनिटानंतर केला जातो. त्या नंतर 15 मिनिटांनी शेवटचा प्रयत्न केला जातो. त्या नंतरही विद्युत प्रवाह सुरळीत झाला नाही तर यंत्र बंद करून त्याची माहिती वरिष्ठ अधिकारीही आणि संबंधित भागातील लाईन स्टाफ यांना दिली जाते.
या नंतर सुरु होते बिघाड शोधण्याची मोहिम. या मोहिमेत सबस्टेशनचे बहुतांश कर्मचारी असतात. नादुरुस्ती अथवा ब्रेकडाऊन, स्पार्किंग, मोडून पडू शकणारी झाडे, इमारतीचा भाग अशा सर्व शक्यता पहिल्यांदा तपासल्या जातात. वेगाने काम तपासणी, टेहळणी, दुरुस्ती करून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. हे करताना नियमाप्रमाणे देण्यात आलेले साहित्य, संरक्षक वस्तू जसे की हातमोजे, हेल्मेट, बूट या वस्तू लाईनमन वापरत असतात.
ग्राहकांसाठी सल्ला काय?
पावसाळा सुरु होण्याअगोदर विद्युत पुरवठा खंडित होऊच नये यासाठी हवी ती काळजी घेऊन दुरुस्ती आणि खबरदारी घेतली जाते. तरी देखील अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतोच. त्यामुळे विद्युत ग्राहकांनी घरातल्या उपकरणांची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय प्रवाह खंडित झाल्यानंतर अर्ध्या तासाने महावितरणच्या संप्रर्क क्रमांकावर (1800 102 3435) संपर्क साधला पाहिजे.
पावसाळ्यात महावितरणची तयारी कशी असते?
ग्राहकांना अडचण येऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी महावितरणकडूनही जोरदार तयारी केली जाते. उदाहरणार्थ याची माहिती घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्याच्या मुख्य अभियंत्यांकडून माहिती घेतली. बीड जिल्ह्यात 190 उपकेंद्र आहेत. त्यात बीड सर्वात मोठं उपकेंद्र आहे. 12 महत्वाच्या सब डिव्हिजनसाठी खास वाहने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण मुख्य अधिकाऱ्यांसह 750 कर्मचारी कार्यान्वित आहेत. वादळी वाऱ्यात विद्युत पुरवठा खंडित किंवा मोठी दुर्घटना घडल्यास त्यासाठी 12 कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक डिव्हिजनला कायमस्वरूपी मोबाईल देण्यात आला आहे, जेणेकरून माहिती जलद समजते.