दुष्काळाची दाहकता, रखरखत्या उन्हात बाळाचा जन्म
वाशिम : राज्यभरात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे परिवारासह भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतात उभारलेल्या पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. इंझोरी शिवारात दुष्काळाच्या विदारकतेमुळे हा प्रकार घडला. सिंधू सुभाष कोरडकर असे बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात नेवसाळ गावात राहणाऱ्या देविदास सदाशिव कोरडकर […]
वाशिम : राज्यभरात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे परिवारासह भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतात उभारलेल्या पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. इंझोरी शिवारात दुष्काळाच्या विदारकतेमुळे हा प्रकार घडला. सिंधू सुभाष कोरडकर असे बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे.
अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात नेवसाळ गावात राहणाऱ्या देविदास सदाशिव कोरडकर आणि त्यांच्य 15 कोरडकर कुटुंबाला वाशिम जिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. कोरडकर हे एक मेंढी पालन करणारे कुटुंब आहे. सध्या हे कुटुंब हजारो शेळ्यामेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात भटकंती करत आहेत. गावात माणसालाच पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पशूंना कसे जगवावे, असा गंभीर प्रश्न या कुटुंबापुढे होता.
रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी मिळावे आणि पशूंचे पोषण व्हावे म्हणून ते भटकंती करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या 15 कुटुंबियांनी इंझोरी शिवारातील अजय ढोक यांच्या शेतात पाल ठोकून तळ मांडला आहे. दिवसाला पुरुष मंडळी शिवारात शेळ्या, मेंढ्या चारतात आणि रात्री शेतात काही जण त्यांची रखवाली करतात. अशात या कुटुंबातील महिला, मुलांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
अशा परिस्थितीमुळे सिंधू सुभाष कोरडकर या महिलेला गर्भवती असतानाही कुटुंबासोबत भटकंती करावी लागली. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याने प्रसुतिचा काळ जवळ आला असतानाही तिला आवश्यक पोषण आहार तसेच आरोग्या सेवाही उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे तिला जवळपास 44 अंश सेल्सिअस तापामानात रखरखत्या उन्हात शेतातील पालातच कुठल्याही आरोग्य सुविधेविना बाळाला जन्म द्यावा लागला. सिंधू यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
आरोग्यसेविकेकडून माणुसकीचा परिचय
इंझोरी शिवारात रखरखत्या उन्हात सिंधू यांची प्रसूत झाली. याबाबत कोरडकर कुटुंबियांनी शेतमालक अजय ढोक यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब नजिकच्या आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधला. परंतु, सुट्टी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी आरोग्य सेविका शारदा वेळूकार यांच्याशी संपर्क केला. त्यासुद्धा एका लग्नाला जाण्याच्या तयारीत होत्या. परंतु, अजय ढोक यांनी सांगितलेला प्रकार ऐकल्यानंतर त्यांनी आशासेविका सुनिता राठोड यांच्यासह थेट घटनास्थळ गाठलं आणि बाळ, आई यांची आरोग्या तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक प्रथमोचार केले.