मालामाल देश शहर बांधायला निघाला, तिजोरी झाली रिकामी; पण सापडला अब्जावधी डॉलर्सचा ‘खजिना’
जगाला तेल पुरविणाऱ्या देशाला आर्थिक संकटाने घेरले होते. याचे कारण म्हणजे त्या देशाच्या प्रिन्सने सुरु केलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प. देशाच्या सार्वभौम संपत्तीच्या निधीपैकी एक चतुर्थांश खर्च त्यांनी या प्रकल्पासाठी खर्च केला. मात्र, या देशाला पुन्हा आणखी एक मोठा अब्जावधी डॉलर्सचा 'खजिना' सापडला आहे.
रियाध | 26 फेब्रुवारी 2024 : सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन 2030′ अंतर्गत अब्जावधी डॉलर्सचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले. यासाठी सौदी अरेबियाने आपली सार्वभौम संपत्तीच्या निधीपैकी एक चतुर्थांश खर्च केला आहे. व्हिजन 2030’ अंतर्गत बांधले जाणारे निओम शहर हे सौदी क्राउन प्रिन्सचे एक मोठे स्वप्न आहे. त्यासाठीच हा इतका मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पामुळे सौदी अरेबियावर आर्थिक संकटाचे वादळ घोंगावत होते. पण, सौदी अरेबियाला आर्थिक संकटाला तारणारा असा अब्जावधी डॉलर्सचा ‘खजिना’ सापडला आहे.
गेल्या वर्षी सौदी अरेबिया सार्वभौम संपत्ती निधी खर्च करणारा जगातील अव्वल देश ठरला. 2023 मध्ये सौदीने 124 अब्ज डॉलर्सच्या एकूण गुंतवणूक केलेल्या सार्वभौम संपत्ती निधीपैकी एक चतुर्थांश खर्च केला. सौदी अरेबियामध्ये नव्याने निओम शहर निर्माण करण्यात येत आहे. याचा एकूण खर्च हा 500 अब्ज डॉलर्स इतका आहे. या शहरात कोट्यवधी खर्चाची नवीन एअरलाइन देखील तयार करत आहे.
सौदी अरेबिया हा देश जगात तेल विक्री करणारा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारा पैसा केवळ तेलामधुच उभा राहणार आहे. मात्र, तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत नसल्याने सौदी अरेबियासमोरील अडचणीत वाढ झाली. तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास अडकले आहेत ते वाढण्याची शक्यता नाही. यावर उपाय म्हणून सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी केले. जेणेकरून जागतिक तेल बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होईल आणि तेलाच्या किमती वाढतील. पण, हा प्रयत्नही फोल ठरला.
तेलाच्या किमती वाढल्या नाहीत तर सौदी कर्जात जाऊ शकते अशी परिस्थिती सौदीत निर्माण झाली आहे. अशातच सौदी अरेबियात जमिनीखाली अब्जावधी डॉलर्सचा ‘खजिना’ सापडल्याने आता प्रिन्स सलमानचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौदी अरेबियामध्ये 15 ट्रिलियन घनफूट नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. हा वायू जाफुराह परिसरात सापडला आहे. यामुळे सौदी अरेबिया नैसर्गिक वायू उत्पादनात मोठी झेप घेणार आहे.
राज्य तेल कंपनी अरामकोच्या जाफुराह क्षेत्रात हा महत्त्वपूर्ण अतिरिक्त गॅस साठा सापडला आहे. जाफुराह फील्डमध्ये अंदाजे 229 ट्रिलियन cf वायू आणि 75 अब्ज बॅरल कंडेन्सेट असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्राला चालना मिळणार आहे. जाफुराह अपारंपरिक वायू क्षेत्र हे राज्याच्या पूर्व प्रांतातील घावर तेल क्षेत्राच्या दक्षिण-पूर्वेस आहे. या खजिन्यामुळे आत्ता सौदी अरेबिया सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक देश बनेल.