World News | गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी महापौरांनी नियम मोडले, जगात कुठे काय घडतंय?
जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. (World Top 50 News Update)
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रोखण्यासाठी जगात सर्वत्र अनेक उपाययोजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे भारत-चीन प्रत्यक्ष सीमारेषा भागातील तणावामुळेही वातावरण चांगलंच तापलं आहे. जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. (World Top 50 News Update)
1. चीन आता पाकिस्तानला हाताशी घेऊन हालचाली करतोय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्ताननं 20 हजार सैनिक तैनात केले आहेत. लडाखच्या उत्तरेला गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तान सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
2. सीमाभागातल्या दहशतवाद्यांसोबत देखील चीननं हातमिळवणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीन सैन्यानं अल बदर या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा केली. जम्मू-काश्मीर सुद्धा अस्थीर ठेवण्याचा चीनचा डाव आहे.
3. चीनला उत्तर देण्यासाठी भारत पुन्हा एकदा स्पाईस बॉम्ब खरेदी करण्याच्या तयारीत आहे. स्पाईसद्वारे जमिनीवरचे बंकर अचूक पद्धतीनं नेस्तनाबूत केले जातात. भारताकडे सध्या देखील स्पाईस बॉम्ब आहेत. मात्र त्यात अजून वाढ केली जाणार आहे.
4. बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकवेळी स्पाईस बॉम्बच वापरण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर भारतीय वायुदलाच्या विमानांनी स्पाईस बॉम्बचा वर्षाव करत दहशतवाद्यांचे बंकर जमीनदोस्त केले होते.
5. कर्ज देऊन चीन पुन्हा एकदा श्रीलंकेला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. चीन लवकरच श्रीलंकेला 50 कोटी डॉलरचं कर्ज देण्याच्या तयारीत आहे. हिंद महासागरात स्वतःच्या विस्तारासाठी चीनसाठी श्रीलंका हे महत्वाचं केंद्र बनलं आहे. (World Top 50 News Update)
6. दरम्यान, श्रीलंकेनंही आता चीनचं कार्ड दाखवून भारताकडे कर्जफेडीसाठी मुदतवाढ मागितली आहे. नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार भारतानं श्रीलंकेला 96 कोटी डॉलरचं कर्ज दिलं आहे.
7. नेपाळच्या पंतप्रधानांना त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी तोंडावर पाडलं आहे. नेपाळचं सरकार अस्थीर करण्यामागे भारताचा काहीही संबंध नाही. पंतप्रधान ओलींनी तातडीनं राजीनामा देण्याचीही मागणी पक्षातून सुरु झाली आहे.
8. हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत पहिली अटक केली गेली आहे. चीननं कायदा लागू केल्यानंतर हाँगकाँगचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी निदर्शनं केली गेली. पोलिसांनी मात्र बळाच्या जोरावर आंदोलनं दडपलं.
9. नेपाळच्या माध्यमांमध्ये नेपाळमधली चीनची महिला राजदूत चर्चेचा विषय बनलीय. चीनचं सरकार नेपाळवर आपल्या राजदूताच्या माध्यमातूनच दबाव टाकत असल्याच्या चर्चा तिथल्या मीडियात सुरु झाल्या आहेत. (World Top 50 News Update)
10. हाओ यांकी असं नेपाळमधल्या चीनी राजदुताचं नाव आहे. याआधी ही महिला पाकिस्तानात 3 वर्ष चीनची राजदूत होती. वादग्रस्त नकाशासह इतर अनेक गोष्टी याच महिलेच्या इशाऱ्यावर होत असल्याचा आरोप होतो आहे.
11. अॅप्स बंदीनंतर आता महामार्ग बांधकामात सहभागी असणाऱ्या चीनी कंपन्यांनाही भारत हद्दपार करतंय. केंद्रीय दळण-वळण खात्यानं हा निर्णय घेतलाय. शिवाय ज्या चीनी कंपन्या रस्ते बांधकामात भागीदार म्हणून आहेत. त्यांचे सुद्धा टेंडर रद्द होणार आहेत.
12. रस्ते बांधकामाआधी भारतीय रेल्वेनं सुद्धा चीनी कंपन्यासोबतचा 471 कोटींचा करार रद्द केलाय. बिजिंगच्या एका कंपनीला दिला गेलेला हा करार सीमेवर झालेल्या घटनेनंतर रद्द केला करण्यात आला आहे.
13. भारत, ऑस्ट्रेलियानं दणका दिल्यानंतर आता अमेरिकेनं सुद्धा बायकॉट चायना मोहिम सुरु केलीय. हुवैई आणि ZTE कॉर्प या दोन्ही कंपन्यांना अमेरिकेनं बंदी केली आहे. अमेरिकेसोबत या दोन्ही कंपन्यांचा करार सुद्धा झाला होता.
14. हुवैई आणि ZTE कॉर्प या चीनमधल्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही कंपन्यामध्ये चीनी सैन्यानं मोठा पैसा गुंतवल्याचा आरोप आहे. शिवाय दोन्ही कंपन्या इतर देशांमध्ये चीनसाठी हेरगिरी सुद्धा करत असल्याचं बोललं जातं. (World Top 50 News Update)
15. भारताच्या अॅप्स बंदीनंतर चीनला मिर्च्या झोंबल्या आहेत. व्यापार युद्ध पुकारण्याचा इशारा देत अॅप्सवरची बंदी भारताला परवडणारी नाही, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाईम्समधून देण्यात आली आहे.
16. बंदी घातलेल्या अॅप्सना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. बंदी घातलेल्या अॅप्सवरचा भारतीयांचा डाटा असुरक्षित असल्याच्या कारणानं अॅप्स बंद केले गेले आहेत. (World Top 50 News Update)
17. दरम्यान, टिकटॉकची केस घेण्यास माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी नकार दिला आहे. भारत सरकारने बंदी घातलेल्या चिनी अॅपच्या बाजूनं खटला लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
18. टिकटॉकच्या सीईओनं टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांसाठी संदेश दिलाय. लवकरच हा वाद मिटून सुरळीत होईल, अशी आशा त्यांनी वर्तवली आहे. पुन्हा एकदा डिजिटल इंडियामध्ये सक्रीय भाग नोंदवण्याकडे आपला कल असल्याचंही टिकटॉकडून सांगण्यात आलं आहे.
19. अमेरिकेनं भारतासोबतची सैन्य भागीदारी आणि आदान-प्रदान वाढवावं, यासाठी दोन सिनेटर्सनी अमेरिकेच्या संसदेत विधेयक मांडलंय. विधेयकाला मंजुरी मिळाली तर F-22 आणि F-35 सारखी अत्याधुनिक विमानं भारताला मिळण्यास मदत होणार आहे.
20. जगात F-35 हे लढाऊ विमानं फक्त अमेरिका, जपान, ईस्रायल आणि दक्षिण कोरिया या देशांकडेच आहे. या चारही देशांसोबत अमेरिकेनं सुरक्षेबाबतीत अनेक करार सुद्धा केले आहेत.
21. फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी भारत सरकारला पत्र लिहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलीय. इतकंच नव्हे तर सीमेवर सुरु असलेल्या वादात फ्रान्स भारताच्या बाजूनं असल्याचंही फ्रान्सकडून सांगण्यात आलं आहे.
22. चीननं सीमेवर जवानांच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात केल्यानंतर भारतानं सुद्धा जवानांची संख्या वाढवलीय. मिसाईल यंत्रणा, टी-90 भीष्म टँकसहित भारतीय जवानही सतर्क आहेत.
23. इंडो-पॅसिफिक प्रदेशात ऑस्ट्रेलियानं आपलं सैन्य बळकट करण्याची तयारी केलीय. त्यामुळे चीन जरी पाकिस्तानला सोबत घेत असला तरी खुद्द चीनच चहुबाजूंनी घेरला जाणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, जपान या सर्व देशांसोबत चीनचे वाद आहेत.
24. जर चीननं सीमेवर मृत्यू झालेल्या जवानांचा आकडा जाहीर केला, तर चीनमध्ये अराजक निर्माण होण्याची भीती असल्याचा दावा खुद्द चीनमधूनच केला जातो आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र जियानली यांग यांनी वॉशिग्टन पोस्टमध्ये याबाबत लेख सुद्धा लिहिलाय.
25. जिनपिंग यांच्या कारभाराबाबत चीन जनतेपेक्षा चीन सैन्याच्या माजी अधिकाऱ्यांमध्ये जास्त संताप असल्याचं सुद्धा जियानली यांग यांनी लिहिलंय. जर पुढेही असंच सुरु राहिलं, तर चीनी सैन्यात बंड उफाळण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे.
26. भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉक बंद करण्याची मागणी जोर धरु लागलीय. तिथल्या काही खासदारांनी याबाबतच्या चर्चेला सुरुवात केलीय. भारतानंतर अमेरिकेत टिकटॉकचं मोठं मार्केट आहे. (World Top 50 News Update)
हेही वाचा – दोस्त असावा तर असा! भारत-रशिया मैत्रीची रंजक कहाणी
27. भारतात चीनी अॅप बंदीचं ऑस्ट्रेलियासह अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी स्वागत केलंय. चीनी कंपन्यांनी हद्द ओलांडल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या अनेक वृत्तपत्रांमधून उमटलीय.
28. ऑस्ट्रेलियातलं मेलबोर्न शहर पुन्हा लॉकडाऊन झालंय. पुन्हा रुग्ण वाढल्यामुळे आता 4 आठवड्यांसाठी मेलबोर्न लॉकडाऊन असणार आहे. ऑस्ट्रेलियातलं दुसरं मोठं शहर म्हणून मेलबोर्न ओळखलं जातं.
29. अमेरिकन लोकांनी जर अजूनही खबरदारी घेतली नाही, तर पुढे दर दिवसाला फक्त अमेरिकेतच एक लाख रुग्ण सापडतील, अशी भीती वैज्ञानिक आणि करोना तज्ञ डॉ. अॅथोनी फॉसी यांनी व्यक्त केलीय.
30. जसा-जसा कोरोना पसरेल, तसा-तसा माझा चीनवरचा संताप वाढत जाईल, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेत काही काळ रुग्णसंख्या स्थिर झाल्यानंतर आता पुन्हा वाढीची चिन्हं दिसू लागली आहे.
31. ‘चर्च’ हे कोरोनासाठी सर्वात खबरदारीचं ठिकाण असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलंय. त्यामुळे तिथं आता नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट या सूचीत आता चर्चला सुद्धा टाकलं जाण्याची चिन्हं आहेत.
32. रेमेडिसीवीर औषधाचा बहुतांश साठा हा अमेरिकेनंच खरेदी केल्याची माहिती आहे.. जागतिक बाजारातून अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात रेमेडिसिविर औषधाची खरेदी केली. या औषधामुळे कोरोनाला आळा घालण्यास सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.
33. बनावट पायलट्सच्या प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर फटका बसतोय. काल व्हिएतनामनं याच प्रकरणामुळे पाकिस्तानला जाणारी विमानं रद्द केली होती. त्यानंतर आता युरोपनं पाकिस्तानातून येणाऱ्या विमानांना तब्बल 6 महिन्यांसाठी बंदी घातलीय.
34. एअरबस कंपनीनं तब्बल 15 हजार लोकांना नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतलाय. एअरबस ही युरोपातली विमान बनवणारी सर्वात मोठी कंपनी मानले जाते. मात्र कोरोनामुळे कंपनीचं नुकसान झाल्याचा दावा केला जातो आहे.
35. जो बिडेन यांनी एका मूळ भारतीय महिलेचा डिजीटल प्रचाराची धुरा सोपवली आहे. मेधा राज असं त्या महिलेचं नाव आहे. बिडेन यांच्या ऑनलाईन प्रचाराची मोठी जबाबदारी आता याच भारतीय महिलेवर असणार आहे..
36. दरम्यान, जो बिडेन यांनी एकही प्रचारसभा न घेण्याचं घोषित केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार मात्र सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या निवडणुका होणार आहेत.
37. चीनमधल्या विगर मुस्लिम महिलांची बळजबरीनं नसबंदी केली जात असल्याचा दावा एका रिपोर्टमधून समोर आलाय. संयुक्त राष्ट्राला याकडे लक्ष घालण्याची मागणी केली जातेय. चीननं मात्र हा आरोप फेटाळलाय.
हेही वाचा – Kung Flu | ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान
38. चीनमध्ये विगर मुस्लिमांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यापैकी हजारो लोकांना चीननं तुरुंगात डांबून ठेवलंय. बिगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची अनेकदा नाचक्की सुद्धा झाली आहे.
39. आकड्यांनुसार सध्या भारतात राजस्थान आणि मध्यप्रदेशमधला रिकव्हरी रेट चांगला आहे. राजस्थानमध्ये 78 तर मध्यप्रदेशात तब्बल 76 टक्क्यांहून जास्त लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
40. आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क महापौरांनीच नियम तोडल्याची घटना समोर आलीय. ब्रिटनमधलं लिसेस्टर शहरातले महापौर लॉकडाऊनच्या काळात आपल्या मैत्रिणीला अनेकदा भेटल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
41. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालताच हजेरी लावलीय. रशियात मास्क सक्तीचा केला गेला असूनही खुद्द राष्ट्रपतींनीच त्या नियमाचं उल्लंघन केलंय.
42. चंडीगडमध्ये आता जर कुणी परदेशातून आलं, तर त्याला स्वतःच्या पैशांनीच एखाद्या हॉटेलात 7 दिवस थांबणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सात दिवस बाहेर राहिल्यानंतर स्वतःच्या घरी जाता येणार आहे.
43. ब्रिटनमध्ये जर मुलं शाळांमद्ये आली नाहीत, तर दंड वसूल करण्याची तयारी सुरु आहे. मात्र पालकांनी या निर्णयाआधीच तीव्र विरोध केला आहे.
44. आसाममध्ये एका तासात कोरोनाचा रिपोर्ट प्राप्त होणार असल्याचा दावा तिथल्या प्रशासनानं केला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात एका तासात रिपोर्ट माहिती होणारी यंत्रणा तिथं उभी केली जाणार आहे.
45. दक्षिण अफ्रिका पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होऊ लागलीय. अफ्रिका खंडात दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक रुग्ण असून सध्याची रुग्णसंख्या दीड लाख आहे.
46. स्पेन आणि पोर्तुगालनं एकमेकांना लागून असलेल्या आपल्या सीमा उघडल्या आहेत. तीन महिन्यानंतर दोन्ही देशांमधले लोक आता देशाबाहेर पडू शकणार आहेत.
47. लॉकडाऊनच्या काळात इतर आजारांचं प्रमाण कमी झालेलं असताना इस्रायलमध्ये मात्र गुप्तरोगांचं प्रमाण कमालीनं वाढलंय. जेरुसलेम पोस्टनं ही बातमी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टसिंग आणि लोकांचं एकमेकांना भेटणं कमी झालं होतं.. त्यामुळे इन्फेक्शनमुळे पसरणारे गुप्तरोग होण्याचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज होता. मात्र नेमकं त्याउलट झालंय. (World Top 50 News Update)
संबंधित बातम्या :
4 आर्टिस्ट, 2292 रोपटी प्रेक्षकाच्या रुपात, प्रत्येक गाण्याला डौलत-डुलत प्रतिसाद
भारताशी भिडणाऱ्या चीनचा माज, तैवानमध्ये लढावू विमानांच्या घिरट्या, मात्र तैवाननेही टेन्शन वाढवलं