20 फूटबॉल मैदानांइतके विस्तीर्ण, 10 हजार बेड क्षमता, जगातील सर्वात मोठं कोविड सेंटर दिल्लीत
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आज (5 जुलै) दक्षिण दिल्लीत 10 हजार बेड क्षमता असलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन केलं (Worlds biggest COVID Centre).
नवी दिल्ली : दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आज (5 जुलै) दक्षिण दिल्लीमधील राधा स्वामी सत्संग व्यास कॅम्पसमध्ये (छत्तरपूर) 10 हजार बेड क्षमता असलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन केलं (Worlds biggest COVID Centre in Delhi). सरदार पटेल असं या कोविड-19 सेंटरचं नाव आहे. (Sardar Patel Covid-19 Center) हे कोविड सेंटर जवळपास 20 फुटबॉल मैदानांच्या आकाराच्या क्षेत्रात पसरलेलं आहे. येथे प्रत्येकी 50 बेडचे 200 विभाग आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत याची माहिती दिली. ते म्हणाले, “डीआरडीओचं (DRDO) 10000 बेडचं कोरोना रुग्णालय तयार झालं आहे. दिल्लीकरांच्यावतीने केंद्र सरकारचे आभार. या ठिकाणी 250 आयसीयू बेड आहेत. याची दिल्लीत सध्या जास्त गरज होती.”
DRDO का 1000 बेड का करोना अस्पताल बनकर तैयार हो गया। दिल्ली वालों की ओर से केंद्र सरकार का शुक्रिया। इसमें 250 बेड ICU के हैं। इसकी दिल्ली में इस वक्त बहुत ज़रूरत है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 5, 2020
भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्यावतीने (ITBP) हे रुग्णालय चालवले जाणार आहे. आयटीबीपीचे महानिर्देशक सुरजीत सिंह देसवाल हेही या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. या कोविड सेंटरमध्ये लक्षणं नसलेल्या अथवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहेत. लक्षणं नसलेल्या ज्या कोरोना रुग्णांना काही कारणाने आपल्या घरी विलगीकरणात राहता येणं शक्य नाही त्यांनाही येथे उपचार घेता येणार आहेत.
राधा स्वामी सत्संग व्यासचे (Radha Swami Satsang Vyas) स्वयंसेवक देखील आयटीबीपी आणि दिल्ली सरकारला हे रुग्णालय चालवण्यात मदत करणार आहेत. दिल्लीचे मुख्य सचिव विजय कुमार देव (Vijay Kumar Dev) यांनी शनिवारी (4 जुलै) या कोविड केंद्राला भेट दिली होती. अॅडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (दक्षिण) अरुण गुप्ता म्हणाले, “रुग्णांचा पहिला गट रविवारी (5 जुलै) या कोविड केंद्रात दाखल होईल.”
रुग्णालयावरील कोरोना रुग्णांचा भार कमी होणार
या कोविड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपराज्यपाल (Lieutenant Governor) अनिल बैजल म्हणाले, “आयटीबीपी, दिल्ली प्रशासन, राधा स्वामी सत्संग व्यासचे स्वयंसेवक आणि इतर अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच इतकी मोठी व्यवस्था तयार केली जात आहे. यामुळे दिल्लीतील रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांची गर्दी कमी करण्यास मदत करेल.”
रिलायन्स जिओला डेटा कनेक्टिव्हिटीसाठी आवाहन
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘एक प्रयास’ या स्वयंसेवी संस्थेने रुग्णांसाठी सॅनिटायजेशन किट दान केल्या होत्या. आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी (दक्षिण) रिलायन्स जिओला कोविड केंद्रात डेटा कनेक्टिव्हिटी देण्याचं आवाहन केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिओने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिओच्या एका पथकाने याबाबत कोविड केंद्राची पाहणी देखील केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 2,505 नवे रुग्ण आढळले. यासह दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 97,200 वर पोहचली आहे. यातील 25,940 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 3,004 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा :
स्वातंत्र्य दिनापासून कोरोनामुक्तीच्या लढ्याला वेग, 15 ऑगस्टपर्यंत लस येण्याची शक्यता
Unlock 2 | ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
Worlds biggest COVID Centre in Delhi