यवतमाळमध्ये शेतकऱ्याच्या प्रतिभेला पंख, इव्हान्का ट्रम्पचा पुतळा साकारत अनोखं स्वागत
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सातघरी येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यांचं अनोखं स्वागत केलं आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सातघरी येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यांचं अनोखं स्वागत केलं आहे (Farmer make Statue of Ivanka Trump). या निमित्ताने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हातांमधील प्रतिभेला पंख फुटलेले पाहायला मिळाले. पंकज राठोड या शेतकऱ्याने आपल्या कलेतून बोटाच्या जादूने मातीला आकार देत इव्हान्का ट्रम्प यांचा हुबेहूब अर्धाकृती पुतळा साकारला आणि त्याचं भारतात आल्याबद्दल स्वागत केलं. ग्रामीण भागातील या अल्पभूधारक शेतकरी पंकजच्या कलेला पाहून ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पंकजला आपल्या बोटांच्या जादुई कलेने मातीला आकार देऊन मुर्ती आणि कॅनव्हासवर कुंचल्यातून चित्र रेखाटन्याचा छंद आहे. त्याने आपल्या याच छंदातून इव्हान्का ट्रम्प यांचं छायाचित्र समोर ठेवून मातीपासून कमळात अर्धाकृती हुबेहूब पुतळा तयार केला. या पुतळ्याच्या माध्यमातून पंकजने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हान्का ट्रम्प यांचं भारत भेटीत आगळं वेगळं स्वागत केलं.
पंकजने आपल्या छंदातून अशा बर्याच प्रतिकृती तयार केल्या आहेत. पंकजला या व्यतिरिक्त कॅनव्हासवर पेंटींग करण्याचाही छंद आहे. त्याने आतापर्यंत बरेच काल्पनिक चित्र, राष्ट्रपुरुष, देवी, देवता, प्राणी, पक्षी, काल्पनिक देखाव्यांच्या मातीच्या मुर्ती आणि कुंचल्यातून चित्र साकारले आहेत.
विशेष म्हणजे पंकजने या कलेचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही. त्याला ही कला त्याच्या एकाग्रतेतून आणि छंदातून अवगत झाल्याचं त्याने सांगितलं. काही तरी वेगळं करून दाखवायची इच्छाही त्याने यावेळी बोलून दाखवली. याच हेतूने तो दिग्रसला आला होता. छंदाने झपाटलेल्या पंकजने इव्हान्का ट्रम्प यांचा हुबेहूब अर्धाकृती पुतळा साकारून अमेरीकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हान्का ट्रम्प यांचं खास स्वागत केलं.
Farmer make Statue of Ivanka Trump