चंद्रपूरमध्ये अतिरेकी धाडस भोवलं, कारसह तरुण वाहून गेला
चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाने नद्या धोक्याच्या पातळीवर पोहचल्या आहेत. अशातच इरई नदीत एक युवक कारसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाने नद्या धोक्याच्या पातळीवर पोहचल्या आहेत. अशातच इरई नदीत एक युवक कारसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज बिपटे असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे. चंद्रपूर शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावर ही घटना घडली.
संबंधित युवक भटाळी येथील कोळसा खाणीत काम करत होता. मंगळवारी (6 ऑगस्ट) सकाळी शिफ्ट संपल्यावर ते तेथून तुकुमकडे आपल्या घरी येण्यासाठी कारने निघाला. त्यासाठी त्याला भटाळी गावाजवळील नदीवरील पुलावरुन जावे लागणार होते. संबंधित पुलाची उंची अतिशय कमी आहे. तसेच नदीतील पाण्याची पातळीही वाढल्याने पुलावर पाणी होते. त्यामुळे मागील एका आठवड्यापासून हा पुल बंद होता. असं असताना संबंधित युवकाने अतिरेकी धाडस करत पुलावरील पाण्यातून गाडी नेली. त्यावेळी पाण्याच्या दबावाने तरुण गाडीसह वाहून गेला. तरुणाचा अद्यापही शोध सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान गडचिरोलीतील आष्टी येथे वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-चंद्रपूर मार्गही बंद आहे. 1 तारखेपासून सतत होणारा पाऊस आणि गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ होऊन महामार्ग बंद झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडचिरोली-चंद्रपूर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत नदीच्या काठावर दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या मार्गावरून येण्याजाण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे.