फसवणुकीप्रकरणी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्याला अटक
‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पुणे : ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठी वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी (18 जून) मिलिंद दास्ताने आणि सायली दास्ताने यांना अटक केली. त्यानंतर या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
औंध येथील पीएनजी ब्रदर्सच्या अक्षय गाडगीळ यांनी शनिवारी (15 जून) मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीएनजी ब्रदर्स या सोन्याच्या दुकानातून मिलिंद दास्ताने यांनी तब्बल 25 लाखांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटं विकत घेतले होते. गेल्या वर्षभरात मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने पीएनजी ब्रदर्समधून वेळोवेळी सोन्याचे दागिने, बिस्किटं, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण 25 लाख 69 हजार रुपयांचे दागिने उधारीवर खरेदी केले. त्यानंतर बिलाची रक्कम देताना दास्ताने टाळाटाळ करु लागले. मुंबईमधील स्वतःच्या मालकीची जागा विकून पैसे देतो, असं सांगून त्यांनी अनेकदा पैसे देण्याचं टाळलं.
काही दिवसांनी दास्ताने यांनी बिलाची रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे अक्षय गाडगीळ यांनी दास्ताने आणि त्यांच्या पत्नीवर फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी 25 लाख रुपयांच्या बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अक्षय गाडगीळ यांनी केला.
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत दास्ताने आणि त्यांच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली असून न्यायालयाकडून त्यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
आज्या-शितली निरोप घेणार, ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा शेवटचा भाग ठरला!
#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली