सकाळी सकाळी ‘या’ 10 गोष्टी करण्याची सवय लावा; तुम्हाला विश्वासही बसणार नाही अशा…
सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. या लेखात, तज्ज्ञांनी सुचवलेल्या दहा सकाळच्या सवयींचा उल्लेख आहे. यामध्ये पहाटे उठणे, पाणी पिणे, व्यायाम, ध्यान, नियोजन, संतुलित नाश्ता, स्नूझ बटन टाळणे, स्क्रीन टाइम कमी करणे, स्वतःवर प्रेम करणे आणि कठीण काम आधी करणे यांचा समावेश आहे. या सवयींचा अवलंब करून आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकतो.
सध्याच्या युगात आपण फार व्यस्त असतो. आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. थकवा येणं, प्रचंड झोप येणं, चिडचिड होणं या गोष्टी त्यामुळे घडत असतात. आपलं दैनंदिन आयुष्य अत्यंत गंभीर असतं. आपल्याला जर शिस्तीने जीवन जगता आले, तर परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी आपली सकाळ बदलली पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांनीही आपली सकाळ पूर्णपणे वेगळी होण्यासाठी काही खास 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा अवलंब केल्यास आपलं जीवन बदलू शकतं.
कोणत्या गोष्टी बदलाव्यात?
पहाटे उठणे
पहाटे किंवा सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. नियमितपणे त्याचवेळी उठा. एखाद्या दिवशी पहाटे 4 वाजता उठायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता उठायचं असं करू नका. त्यामुळे शिस्त येत नाही. शरीरालाही शिस्त लागत नाही. वेळेत आणि नियमित त्याच वेळेत उठण्याची सवय कधीही चांगली.
पाणी प्या
सकाळी उठल्यावर सर्वात आधी भरपूर पाणी प्या. आपण रात्रभर झोपून असतो. या 6 ते 7 तासात आपल्या शरीराला पाणी मिळत नाही. त्यामुळे उठल्यानंतर शरीराच्या ‘इंजिन’ला चालना देण्यासाठी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
व्यायाम करा
सकाळी व्यायाम केल्याने मूड चांगला राहतो आणि दिवसभर ताजेतवाने राहता येते. शरीराला ऊर्जा मिळते. व्यायामामुळे मानसिकतेला स्थिरता मिळते.
ध्यान करा
सकाळी उठल्यावर नियमितपणे काही मिनिटं तरी ध्यान करा. आपले विचार शांत करून आपल्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. यामुळे दिवसाची योग्य योजना करणे आणि कामांवर लक्ष केंद्रीत करणे सोपे होते.
प्लानिंग करा
प्रत्येक दिवशी एक छोटीशी योजना तयार करा. यामुळे तुमच्या कामांना दिशा मिळेल. तसेच तुमचं कामही सोपं होईल.
नाश्ता करा
बरेच लोक अपुरा नाश्ता करतात. रोज सकाळी संतुलित आणि पौष्टिक नाश्ता करणं आवश्यक आहे. त्यामुळे दिवसभर शरीरातील ऊर्जा पातळी चांगली राहते.
स्नूझ बटण दाबू नका
अनेकांना सकाळी अलार्म लावून झोपण्याची सवय आहे. पण अलार्म वाजल्यानंतर स्नूझ बटन दाबून हे लोक पुन्हा झोपतात. खरं तर पहिल्या अलार्मला उठून व्यायाम सुरू केला पाहिजे. त्यामुळे तुमचं ‘स्लीप सायकल’ सुधारेल.
स्क्रीन टाइम कमी करा
मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा जास्त वापर डोळ्यांवर आणि मेंदूवर ताण आणतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा.
स्वतःवर प्रेम करा
आपल्या कर्तृत्वाला मान्यता द्या आणि आपले कौतुक करा. स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या कामाबद्दल प्रेम दाखवा. यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढेल.
कठिण काम आधी करा
रोजच्या सर्व कामांमध्ये सर्वात कठीण असलेलं काम आधी करा. अशा प्रकारे, बाकीचे काम सोपे होईल आणि तुम्हाला ताण कमी जाणवेल.