8 तासांचा रेल्वेप्रवास अन् 44000 रुपयांचं तिकीट; तरीही या ट्रेनसाठी असते वेटींग लिस्ट, असं काय आहे खास?
तुम्ही कधी 44000 रुपये तिकिटी असलेल्या ट्रेनमधून प्रवास केलाय का? तिकीटाची किंमत ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एवढं तिकीट असतानाही या ट्रेनसाठी चक्क वेटींग लिस्ट असते. असं काय खास आहे या ट्रेनमध्ये? जाणून घेऊयात.
आपल्याला कधी गावी जायचं असेल तेव्हा आपण आपल्या सुविधांनुसार रेल्वेचं तिकीट काढतो . जसं की एसी किंवा नॉर्मल बोगी वैगरे. सोबतच आपण त्या बोगीच्या तिकीटांची किंमतही पाहतो आणि पुढचं नियोजन करतो. बरं यामध्ये बऱ्याच जणांच्या काही ट्रेन या ठरलेल्या असतात. त्यांना त्याच ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. मग वेटींगवर थांबावं लागलं तरी चालेल.
44000 ते 44350 रुपये रेल्वे तिकीट
पण तुम्हाला माहितीये का की, एक ट्रेन अशीही आहे जिच्यासाठी लोक वेटींगवर थांबायलाही तयार असतात. बरं एवढंच नाही तर या रेल्वेच्या तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या रेल्वेचं तिकीट असतं 44000 ते 44350 रुपये. वाचून खरंच धक्का बसला ना. पण हे खरं आहे. मुळात म्हणजे एवढे तिकीट असूनही या ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकं आतुर असतात.
दरम्यान तुम्हाला वाटेल की तिकीटाची किंमत एवढी आहे म्हणजे हा प्रवास नक्कीच लांबचा किंवा 4 ते 5 दिवसांचा वैगरे असेल. पण तसं नाहीये. फक्त 8 तासांच्या प्रवासासाठी तब्बल 44000 ते 44350 रुपये मोजावे लागतात.
कारण या रेल्वेप्रमाणे रेल्वेमार्गही अगदी खास आहे. जो पर्वतरांगामधून वाट काढत पुढे जातो. या रेल्वेचं नाव आहे ग्लेशियर एक्स्प्रेस. ही जगातील सर्वात धीम्या गतीनं धावणारी रेल्वेगाडी आहे असंही म्हटलं जातं.
ट्रेनचा प्रवास असतो फारच खास
हा एक असा रेल्वेमार्ग आहे, जो पर्वतरांगामधून वाट काढत पुढे जातो. शांत अशी टुमदार गावं इथं पाहता येतात, खोल दऱ्या पाहताना लोक मंत्रमुग्ध होतात. 24 मैल इतकं अॅव्हरेज देणाऱ्या या रेल्वेप्रवासादरम्यान विविध निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.
शिवाय उंचावरून डोंगररांगांचं सौंदर्यही अनुभवता येतं. 91 बोगदो ओलांडत पुढे जाणारी ही ट्रेन चार भागांमध्ये विभागली असून, प्रवासादरम्यान स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतशिखरांमधून ती पुढे मार्गस्थ होते.
रोने ग्लेशियर, ओबराल्प खोरं, कमाल वळण असणारा लँडवासर पूल आणि राईनचं खोरं अशा जागतिक दर्जाच्या अद्वितीय ठिकाणांची झलक या एका प्रवासात अनुभवता येते.
ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी असतात खास सोयी-सुविधा
रेल्वेप्रवासातील प्रत्येक वळण जरी खास असलं तरीही ओबराल्पची दरी आणि खोरं हा या प्रवासातील एक असा टप्पा आहे जिथं रेल्वे आणि प्रवासी समुद्रसपाटीपासून सर्वाधिक अर्थात 2033 मीटर इतक्या उंचीवर असतात.
या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, चवीष्ट जेवण अशा एक ना अनेक सुविधा इथं पुरवण्यात येतात. रेल्वेच्या एक्सिलेन्स क्लासमध्ये मिळणाऱ्या सुविधाही अगदीच छान आहे. या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची किंमत 470 स्विस फ्रँक असून, भारतीय चलनानुसार ही किंमत आहे 44350 रुपये. बरं आश्चर्याची बाब म्हणजे तिकीट इतकं महाग असतानाही हा प्रवास करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची वेटिंग लिस्टही तितकीच मोठी असते.