हळदीचे हट्टी डाग ? घरच्या घरी सहज करा साफ !
हळदीचे डाग हट्टी असतात, पण ते काढणं अशक्य नाही ! या काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे कपडे घरच्या घरी नव्यासारखे करू शकता ते ही रसायनमुक्त आणि सुरक्षित पद्धतीने!

हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. ती केवळ चव आणि रंग देण्यासाठीच नाही, तर तिच्या औषधी गुणधर्मांसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, तिचा एक मोठा त्रास म्हणजे कपड्यांवर पडलेले हट्टी पिवळसर डाग! एकदा का हळदीचा डाग पडला, की तो काही केल्या निघत नाही ही अनेकांची तक्रार असते. हळदीतील कर्क्यूमिन हे घटक रंग कायम ठेवण्याची क्षमता बाळगतात, त्यामुळे डाग सहजपणे जाणं कठीण होतं. पण घाबरू नका! काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांनी तुम्ही हे डाग घरच्या घरीच साफ करू शकता, तेही कपड्याचं नुकसान न करता.
1. लिंबू आणि मीठ: नैसर्गिक क्लिनर
कपड्यावरील हळदीचा डाग ताजा असेल, तर लिंबाचा रस आणि मीठ वापरून तुम्ही तो काढू शकता. डागावर ताजं लिंबू पिळा, थोडं मीठ शिंपडा आणि हलक्या हाताने चोळा. हे मिश्रण डागावर 15 मिनिटं राहू द्या, नंतर कपडा धुवा. उन्हात सुकवल्यास परिणाम अधिक चांगला दिसतो.
2. बेकिंग सोडा: हट्टी डागांसाठी प्रभावी उपाय
1 चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा आणि 20 मिनिटं तसेच ठेवा. पेस्ट वाळल्यानंतर ती सौम्यपणे चोळा आणि कपडा थंड पाण्याने धुवा.
3. सिरक्याचा उपयोग: डाग हलके करण्यासाठी उत्तम
पांढऱ्या सिरक्यामध्ये असलेल्या अॅसिडिक गुणधर्मांमुळे हळदीचे डाग फिकट होतात. डागावर थोडासा सिरका टाका, काही मिनिटं राहू द्या आणि मग कपडा धुवा. गरज भासल्यास प्रक्रिया दोनदा करा.
4. हँड सॅनिटायझर किंवा अल्कोहोल
जर हळदीचा डाग खूप दिवसांपासून असेल, तर थोडा हँड सॅनिटायझर वापरा. डागावर टाकून 5-10 मिनिटं ठेवा आणि मग हलक्या हाताने रगडा. त्यानंतर कपडा साबणाच्या पाण्यात धुवा.
5. टूथपेस्ट: सोपा आणि जलद पर्याय
पांढऱ्या रंगाचा टूथपेस्ट डागावर लावा, 15 मिनिटं ठेवा आणि ओल्या कापडाने पुसून टाका. नंतर कपडा धुवा. टूथपेस्टमधील सफाई घटक डाग हलके करतात.