कानात कुर्रर करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा… बाळाचं नाव काय ठेवणार?; लयभारी टिप्स
बाळाचे नाव ठेवणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. नाव सोपे, लहान आणि अर्थपूर्ण असावे. उच्चारणासाठी कठीण, लांब किंवा खिल्ली उडवली जाणारी नावे टाळावीत. प्राचीन किंवा दुर्मिळ नावांच्या ऐवजी, काळास अनुसरून असलेले आणि कॉमन नसलेले नाव निवडावे. नावाचा अर्थ सकारात्मक आणि प्रेरणादायी असावा जेणेकरून बाळाचे व्यक्तिमत्त्व चांगले विकसीत होईल.
जेव्हा घरात नव्या पाहुण्याचं आगमन होतं, तेव्हा आपल्या घरात आनंदाचा पारावार उरत नाही. लहान बाळाचं आगमन झाल्याने संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होतो. सर्वांचे चेहरे खुलून जातात. त्यानंतर बाळासाठी अनेक नवनवीन गोष्टी खरेदी केल्या जातात. त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं सर्वांना होतं. काही लोक तर बाळाचं नाव काय असावं यावर खल करतात. बाळाचं नाव ठेवण्यासाठी नाव शोधण्याची मोहीमच जणू सुरू होते. प्रत्येकाला आपल्याच पसंतीचं नाव ठेवावं असं वाटत असतं. पण मुलांची नावे ठेवताना काय काळजी घेतली पाहिजे? यावरच आपण बोलणार आहोत.
उच्चारण्यास कठिण
मुलांची नावे ठेवताना अनेकदा कठिण नावे ठेवली जातात. अशी नावे ठेवणे ही फॅशनच झाली आहे. पण ही नावे आपल्याला तरी उच्चारता येतात का? याची कोणी काळजी घेत नाही. विचारही करत नाही. उच्चारण्यास कठिण असलेल्या नावांमुळे मुलाला शाळेत, मित्रांमध्ये आणि समाजात अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा कठीण नावामुळे त्यांचे नावच चुकीचे वाचले जाते. त्यामुळे नाव सोपे, स्पष्ट आणि सहज उच्चारता येणारे असावे.
लांबलचक नाव
नाव नेहमी लहान आणि साधं असायला हवं. मोठं आणि लांब नाव लिहिणे आणि लक्षात ठेवणे कठीण होऊ शकतं. त्यामुळे छोट्या आणि साध्या नावांचा विचार करावा.
अर्थपूर्ण नाव
नावाचा अर्थ सदैव सकारात्मक आणि प्रेरणादायी असावा. नकारात्मक किंवा अशुभ अर्थ असलेले नावे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करू शकतात. असे म्हटले जाते की, ज्याचे नाव जसे असते, त्याचे व्यक्तिमत्त्वही तसचं असते.
खिल्ली उडवली जाणारी नावे
आपण घरी मुलांना लाडाने काही एक नावाने हाक मारतो. पण बाहेरही त्याच नावाने त्याला हाक मारली जाणार नाही आणि त्याची खिल्ली उडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या. त्यामुळे मुलाला बाहेर अपमानास्पद वाटू शकतं. त्याच्या जीवावर ते येऊ शकतं.
दुर्मीळ नावे
अनेकांना अत्यंत दुर्मीळ नावे ठेवण्याची सवय असते. प्राचीन किंवा जुन्या वळणाची नावे ठेवली जातात. तुम्हाला प्राचीन आणि जुन्या गोष्टीत इंटरेस्ट असू शकतो. तो तुमचा स्वभाव आहे. पण जन्माला आलेल्या मुलाला त्या गोष्टी आवडतीलच असे नाही. त्यामुळे त्याचं नाव जुन्या वळणाचं ठेवू नका. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा काळ फार बदलेला असेल. त्या काळाला साजेशा नावाचा विचार करूनच नाव ठेवलं पाहिजे.
कॉमन नाव नको
काही नावे खूपच कॉमन असतात. अशा नावाची असंख्य मुले असतात. काही नावे तर मुला-मुलींची सेम असतात. अशा नावांपासून सावध राहणे आवश्यक आहे. नाव मुलाची ओळख असते, आणि एक सामान्य नाव मुलाची वेगळी ओळख निर्माण करू शकत नाही.