ताप आल्यावर अंघोळ करावी का?; तुम्हाला ‘ही’ गोष्ट माहिती का?
व्हायरल ताप असताना हलक्या पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असू शकते, परंतु वृद्ध आणि लहान मुलांनी काळजी घेतली पाहिजे. लेखात व्हायरल तापाची लक्षणे, त्याची प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचारांची माहिती दिली आहे. स्वच्छता, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे आहार आणि विश्रांती महत्त्वाची आहेत.
ताप आल्यावर आपण आपली स्वत:ची प्रचंड काळजी घेतो. अंगावर सतरंजी वगैरे घेऊन झोपतो. थंडी वाजू नये म्हणून बरीच काळजी घेतो. पंखेही लावत नाही. तेलकट, तिखट खाणंही टाळतो. एवढंच कशाला ताप अंगात असेल तर आपण अंघोळही करत नाही. तापात अंघोळ करायची नसते असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. त्यामुळे आपण ते पथ्य पाळत असतो. पण खरोखरच अंगात ताप असताना अंघोळ करायची नसते का? ताप असलेल्या व्यक्तीला आंघोळ केल्याने काही समस्या होऊ शकतात का? हे समजून घेऊया.
व्हायरल ताप असताना आंघोळ करता येईल?
व्हायरल ताप असताना अंघोळ करणे चांगलं असतं. त्यामुळे शरीर स्वच्छ होतं. शरीरातील सर्व घाण साफ होते. आणि ऊर्जाही वाढते. अंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होण्यास मदतही होते. त्यामुळे व्हायरल ताप असताना हलक्या गार पाण्याने अंघोळ करायला हरकत नाही.
असं असलं तरी ज्यांना व्हायरल ताप आहे अशा वृद्धांनी आणि लहान मुलांनी अंघोळ करू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती एकसारखी नसते. लहान मुलं आणि म्हाताऱ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना ताप असताना अंघोळ घालू नये. नाही तर तब्येत बिघडण्याचा धोका असतो.
व्हायरल तापाची लक्षणे
व्हायरल तापाची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. या तापात अंग दुखतं, वेदना होतात. डोकेदुखी, थकवा, घशात खवखवणे, खोकला, सर्दी होणे आणि भूक न लागणे या समस्या जाणवतात. व्हायरल तापात अशक्तपणा येतो. वजन कमी होतं. अंगात त्राण राहत नाही.
ताप कसा टाळावा?
व्हायरल ताप येऊ नये किंवा तो टाळण्यासाठी वेळोवेळी हात धूत राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वच्छता जेवढी टेवाल तेवढा ताप येण्याची शक्यता कमी असते. शिवाय ताप आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहू नका. बाहेर जाताना मास्क लावा. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे पदार्थ खा. ब्रोकोली, पपई, रताळे, अद्रक सायट्रस फळे, आवळा, सुकामेवा आदींचा आहारात समावेश करा. तसेच, ताप असताना थंड खाद्यपदार्थ आणि फास्ट फूड खाऊ नका. ताप असतानाही भरपूर पाणी प्या.
उपाय काय?
व्हायरल ताप आल्यावर अधिक काम करू नका. दिवसभर विश्रांती घ्या. डॉक्टरांकडून औषधे घ्या. हलका आहार घेऊन झोपा. एखादा रुमाल भिजवून गळ्यात ठेवा. व्हिटॅमिन सी असलेली फळे खा.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)