त्वचेची खाज ते उष्माघात; उन्हाळ्यातील आजारांपासून कशी मिळवाल सुटका?
उन्हाळा येताच त्वचेच्या समस्या सुरू होतात. यामध्ये खाज सुटणे आणि उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ येणे सामान्य आहे. परंतू उन्हाळ्यात अनेकांना त्वचेवर खाज सुटणे आणि उष्माघातामुळे त्रास होतो. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर काही घरगुती उपायांनी तुम्हाला या समस्येपासुन आराम मिळू शकतो.

उन्हाळा ऋतू सुरू झाला की अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या डोकं वर काढतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे खाज सुटणे आणि उष्माघात. जेव्हा तापमान वाढते आणि जास्त घाम येतो तेव्हा त्वचेचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे शरीरावर लहान पुरळ आणि खाज सुटू लागते. विशेषतः, ही समस्या मान, पाठ, चेहरा, अंडरआर्म्स आणि मांड्यांवर जास्त आढळते. या समस्यांसाठी, लोक अनेकदा बाजारातून विकत घेतलेल्या क्रीम किंवा लोशनचा वापर करतात. परंतु त्यामध्ये असलेल्या हार्श कॅमिकलचे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
अशा परिस्थितीत, तुम्ही नैसर्गिक आणि घरगुती उपचार करू शकतात. कारण या घरगुती उपायाने तुमच्या त्वचेला कोणतेही दुष्परिणाम होत नाही. शिवाय त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात त्वचेची अॅलर्जी, खाज सुटणे आणि उष्णतेच्या पुरळांचा म्हणजेच घामोळयांचा त्रास होत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे वापरून तुम्ही उष्णतेच्या पुरळ आणि खाज सुटण्यापासून आराम मिळवू शकता.
चंदनाची पेस्ट लावा
चंदन हे एक नैसर्गिक थंडावा देणारे घटक आहे जे त्वचेची जळजळ, खाज सुटणे आणि घामोळ्यांना त्वरित शांत करते. चंदनाची पेस्ट त्वचेवर लावल्याने घामामुळे झालेले पुरळ लवकर बरे होतात आणि त्वचा थंड राहते. हे लावण्यासाठी, एक चमचा चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. घामोळ्या आलेल्या भागावर आणि खाज सुटलेल्या भागांवर ते लावा आणि 15-20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. दिवसातून 1-2 वेळा वापरल्याने तुम्हाला आराम मिळेल.
मुलतानी माती वापरा
मुलतानी माती ही उष्णता आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे केवळ घामामुळे बंद झालेले छिद्र उघडत नाही तर खाज आणि उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या हे देखील दूर करते. यासाठी 2 चमचे मुलतानी माती थंड पाण्यात किंवा गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर खाज आणि पुरळ आलेल्या भागावर लावा आणि 15-20मिनिटे सुकू द्या. यानंतर थंड पाण्याने धुवा. दिवसातून एकदाच हा उपाय करा.
बर्फ लावा
उन्हाळ्यात उष्माघात आणि खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी, बर्फ लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ते त्वचेला थंड करते आणि जळजळ, लालसरपणा आणि खाज कमी करते. यासाठी, 2-3 बर्फाचे तुकडे एका स्वच्छ कापडात गुंडाळा आणि खाज सुटलेल्या किंवा उष्णतेच्या पुरळ असलेल्या भागावर 5-10 मिनिटे हलक्या हाताने फिरवत राहा. दिवसातून 2-3 वेळा असे केल्याने लगेच आराम मिळेल.
कोरफड
कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि थंड करण्याचे गुणधर्म असतात, जे घामोळ्या, खाज सुटणे आणि पुरळ लवकर बरे करण्यास मदत करतात. ते त्वचेला हायड्रेट देखील करते, ज्यामुळे नवीन मुरुमे येण्यापासून रोखले जाते. घामोळ्या आणि त्वचेवरील खाज या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ताजे कोरफडी जेल प्रभावित भागावर लावा. 15-20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. तुम्ही दिवसातून दोनदा हा उपाय करू शकतात.
काकडी देखील आराम देईल
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी हा सर्वोत्तम मार्ग आहे. ते त्वचेला हायड्रेट करते आणि खाज सुटणे आणि घामोळ्यांपासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला एक थंड काकडी घ्या आणि त्याचे पातळ तुकडे करा. हे तुकडे खाज सुटलेल्या किंवा घामोळ्या आलेल्या भागावर ठेवा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय दिवसातून दोनदा करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)